गोवेकरांच्या हितासाठी लढत राहणार; आरजीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:34 PM2023-12-20T13:34:01+5:302023-12-20T13:34:51+5:30
अस्तित्व सभेत गोमंतकीयांना सहकार्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : सत्तेवर असलेले सरकार लोकांना न्याय देण्यास, त्यांचे प्रश्न हाताळण्यास, त्यांना प्राथमिक सुविधा देण्यास अपयशी ठरले असल्याने गोवेकरांचे हित राखण्यासाठी स्थापन झालेला रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष भविष्यातही गोवेकरांच्या हितासाठी अस्तित्वासाठी लढत राहणार, असा निर्धार आरजीच्या नेत्यांनी मंगळवारी केला.
आरजीने येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित केलेल्या अस्तित्व सभेत सरकारवर टीका करण्यात आली. आमदार वीरेश बोरकर, मनोज परब व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. गोवेकर गोव्यात पोरका झाला आहे. आपली वोट बँक तयार करण्यासाठी काही राजकारण्यांनी बाहेरील लोकांना गोव्यात आणले आहेत. त्यातून गावातून झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. झोपडपट्ट्यांना सुरक्षा दिली जाते. त्या जमीनदोस्त होण्याची गरज आहे. गोवेकरांच्या युवा पिढीच्या आपले हक्क मिळण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.
सरकारला गोवेकरांच्या हिताचे काहीच पडलेले नाही. ते केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत. म्हादई वाचवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरील विचार करण्याची वेळ आली आहे. 'पोगो' कायद्यासाठी आजही आरजीकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोरकर म्हणाले. म्हापशातील फुल मार्केटमध्ये आरजीच्या वतीने फुलराणी ही गोमंतकीय महिला फुल विक्रेत्यांची संघटनेची स्थापना करण्यात आली.
ज्येष्ठ विक्रेत्याच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. गावागावांतील स्थानिक विक्रेत्यांना एकत्रित आणण्यात येणार आहे. त्यांची नोंदणी करून त्यांना सहकार्य तसेच आधार दिला जाईल. विक्रेत्यांना त्रास दिला तर संघटना त्यांच्या मागे राहील, असे मनोज परब यांनी यावेळी सांगितले. गोव्याचे भविष्य फक्त आरजीवर अवलंबून आहे. लोकांना आता हा एकमेव पर्याय राहिला आहे. त्यामुळे लोकांनी आरजीकडे आपले भविष्य म्हणून पाहावे, असे आवाहन आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी या सभेतून केले.
बाजारपेठेतील फुल विक्रेत्यांनाही एकत्र आणण्यात येईल. राज्याबाहेरील विक्रेत्यांनी बाजारावर कब्जा केला आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेत्यांचे हित जोपासण्यासाठी ही संघटना स्थापन केल्याचे परब यांनी सांगितले. राज्याबाहेरील विक्रेत्यामुळे स्थानिक विक्रेत्यांवर परिणाम होतो. स्थानिकांच्या हक्कासाठी विधानसभेतही आवाज उठवणार असल्याचे आमदार बोरकर यांनी सांगितले. भविष्यात राज्या बाहेरील विक्रेत्यांमुळे स्थानिकांवर होणारा परिणाम सहन केला जाणार नसल्याचा इशाराही बोरकर यांनी दिला. यावेळी विक्रेत्यांनी आपल्या समस्या सांगितल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्ल करण्याची मागणी केली.