दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देणार का? बिलावल भुट्टोंच्या उत्तरानं पाकिस्तानचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 10:45 PM2023-05-06T22:45:36+5:302023-05-06T22:46:39+5:30
भुट्टो यांनी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांसमोर आला.
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीसाठी भारतात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी शुक्रवारी एका प्रश्नावर दिलेल्या उत्तरानं पाकिस्तानचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. बिलावल भुट्टो यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. पण दाऊदचा उल्लेख होताच बिलावल भुट्टो अस्वस्थ दिसले. बैठकीत दहशतवादाला पाठिंबा देण्याचं पाकिस्तानचं धोरण, सीमापार दहशतवादाच्या प्रश्नांना उत्तर देताना बिलावल यांना घाम फुटला.
दरम्यान, भुट्टो यांनी आपलाच देश दहशतवादानं त्रस्त असल्याचं म्हटलं. तसंच दहशतवाद एक मोठी समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देत असल्याबाबत त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते यावर उत्तर देऊ शकले नाहीत. अनेक वर्षांपासून कराचीत असलेल्या दाऊदवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगाराला अजून भारताकडे सोपवलं नाही, तर पाकिस्तानच्या हेतूबद्दल कसा विश्वास ठेवायचा? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावर घाम फुटलेल्या भुट्टोनी दिलेल्या उत्तरावरून पाकिस्तानचा चेहरा समोर आला.
संवादाची कमतरता जबाबदार
काश्मीर धोरण आणि भारत पाकिस्तान दरम्यानच्या संवादाच्या कमतरतेवर लक्ष दिलं पाहिजे. भारतानं आंतरराष्ट्रीय कायजे, संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव यांचं उल्लंघन केल्याचे भुट्टो म्हणाले. दोन्ही देशांमध्ये संवाद नाही हे ५ ऑगस्ट २०१९ च्या कारवाईचा परिणाम असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मोस्ट वाँटेड दाऊदला भारताकडे सोपवून दोन्ही देशांतील तणाव कमी होईल हे मानण्यापासून त्यांनी नकार दिला.