संकल्पचे स्वप्न लवकरच पूर्ण करणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले मंत्रिपदाचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 12:19 PM2024-07-02T12:19:19+5:302024-07-02T12:20:39+5:30
मुरगाव तालुक्यात यामुळे बरीच चर्चा रंगली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : आमदार संकल्प आमोणकर यांनी पाहिलेले स्वप्न यापुढील तीन वर्षात साकार होणार हे मुख्यमंत्री या नात्याने मी सर्वांना ठामपणे सांगतो. मुरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आमोणकर भाजपमध्ये आले. त्यानंतर मुरगावातील जनता 'गुड न्यूज' कधी मिळणार याची सातत्याने वाट पाहत असून, लवकरच ती मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
मुरगाव तालुक्यात यामुळे बरीच चर्चा रंगली आहे. संकल्प आमोणकर यांना लोकांच्या अभिनंदनाचेही फोन येऊ लागले आहेत. रविवारी सडा येथे मुख्यमंत्र्यांनी आमोणकर यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करताना आमोणकर यांनी स्वतः साठी काहीच न मागता मुरगाव मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी विविध मागण्या केल्या. मुरगाव मतदारसंघात विविध प्रकल्प, उपक्रम राबविण्यासाठी सरकारकडे ते आग्रही राहिले आहेत. त्यामुळे यापुढेही मी त्यांच्या पाठीशी असेन. संकल्प माझे जवळचे मित्र असून त्यांच्यावर कधीच अन्याय होणार नाही.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आमोणकरांना मंत्रिपद देण्याचे संकेत दिल्याने मुरगाव मतदारसंघातील जनता खूपच आनंदित आहे. सध्याच्या घडामोडींमुळे संकल्प यांचे कार्यकर्तेही सुखावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.