‘एसटीं’ना आरक्षण देणारच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजप कोअर कमिटीची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 09:25 AM2023-08-23T09:25:02+5:302023-08-23T09:26:16+5:30

लोकसभा निवडणुकीविषयी रणनीतीवर चर्चा.

will give reservation to st cm pramod sawant bjp core committee meeting | ‘एसटीं’ना आरक्षण देणारच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजप कोअर कमिटीची बैठक 

‘एसटीं’ना आरक्षण देणारच: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; भाजप कोअर कमिटीची बैठक 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीच्या काल, मंगळवारी झालेल्या बैठकीत एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय प्रामुख्याने आला. विधानसभा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा समाजाच्या एका गटाने दिला आहे. तसे झाल्यास पक्षाला ते मारक ठरू शकते, त्यामुळे आरक्षणासाठी आताच केंद्रात रेटा लावण्याचे ठरले.

एसटी समाजाच्या मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेने गावागावांत जागृती घडवून आंदोलन उभे करण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असाही इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात गावडा, कुणबी, वेळी आदी अनुसूचित जमातींमधील लोकांची संख्या सुमारे १०.४३ टक्के आहे. लोकसभा निवडणूक जवळ असताना या समाजाची नाराजी ओढवून घेऊन चालणार नाही, असा सूर बैठकीत व्यक्त झाला. केंद्राने राज्य सरकारच्या पत्राला दिलेल्या उत्तरात एसटींना विधानसभा आरक्षण तूर्त देता येणार नाही. २०२६ च्या जनगणनेनंतरच काय तो निर्णय घेतला जाईल, असे कळवले आहे,

पाच प्रवक्ते नियुक्त, सोपटे, ग्लेन तिकलोंना स्थान

दरम्यान, भाजपने पाच प्रदेश प्रवक्त्यांची नियुक्ती केली. माजी आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार ग्लेन तिकलो तसेच अॅड. यतिश नायक, प्रभाकर गावकर व गिरीराज पै वेर्णेकर यांना प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे. यतिश व गिरीराज हे यापूर्वीही प्रवक्ते होते. परंतु सावियो रॉड्रिग्स यांना हटविण्यासाठी गेल्या जानेवारीत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्तीचा आदेशच रद्द करण्यात आला होता.

मोदीजी व अमित शहांना भेटणार: तवडकर

सभापती रमेश तवडकर यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत एसटींचा विषय आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले की, एसटी प्रवर्गाला विधानसभा आरक्षणाच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्ष पातळीवर तसेच सरकारी पातळीवर प्रधान्यक्रमाने भेटण्याचा निर्णय झालेला आहे. लोकसभा निवडणुकीआधी याबाबतीत केंद्र सरकारकडे तांत्रिकी मुद्यांवर चर्चा केली जाईल.

२०२७ च्या निवडणुकीआधी आरक्षण : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, २०२७ च्या निवडणुकीआधी एसटी समाजाला विधानसभा आरक्षण मिळेल. सरकार यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत असून, सातत्याने पाठपुरावा करत आहे. ते म्हणाले की, कोअर कमिटीच्या बैठकीत येत्या लोकसभा
निवडणुकीबाबत आढावा घेतला. निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरु केली आहे.


 

Web Title: will give reservation to st cm pramod sawant bjp core committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.