एसटींना २०२७ निवडणुकीवेळी आरक्षण देऊ: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 02:08 PM2023-11-16T14:08:21+5:302023-11-16T14:09:39+5:30
याप्रश्नी लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: अनुसूचित जमातींना २०२७ च्या निवडणुकीसाठी एसटींना राजकीय आरक्षण देऊ असे भाजपने स्पष्ट केले आहे. सध्या काहीजण जी मागणी करताहेत, ती राजकीय हेतूने प्रेरित आहे, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. याप्रश्नी लवकरच एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बिरसा मुंडा जयंतीनिमित एसटी एससी आयोगाने पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील आंदोलने आणि विरोध है राजकीय हेतूने प्रेरित लोक करीत आहेत. सरकार विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आहे. २०२७ च्या निवडणुकीत एसटी आरक्षण होणार, हे भाजपचे स्पष्ट मत आहे.' जनगणनेनंतरच सीमांकन आयोगाची स्थापना होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यात कुणीही राजकारण करु नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
त्यांना विरोधक भडकावताहेत
'गोव्यात २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला निश्चित राजकीय आरक्षण देता येईल. त्यामुळे सध्या काहीजण आताच आरक्षण करण्याची मागणी करत आहेत. ती राजकीय हेतूने आहे, त्यांना विरोधक भडकावत आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.