बेकायदेशीर बीफ विक्रीला प्रोत्साहन देणार काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 10:30 PM2018-01-09T22:30:47+5:302018-01-09T22:30:57+5:30
गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे.
पणजी: गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे. समितीचे निमंत्रक हनुमंत परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सर्व नियमांचा भंग करून गोव्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेली बीफची बेकायदेशीर वाहतूक बंद पडली म्हणून गळा काढणारे हे बेकायदेशीर व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीफच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली असून, त्यांचे पालन करणे सक्तीचे आहे. मांस प्रकल्पापासून विक्रीच्या स्थानापर्यंतची सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री माहिती असणे आवश्यक आहे. मारल्या जाणा-या जनावरांचे वय, आरोग्य, त्यांची वाहतूक करण्याची पद्धत, त्यासाठी मिळवावे लागणारे विविध परवाने. जनावरांची हत्त्या करण्याची पद्धत आणि नंतर मांस विक्रेत्यापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया या बद्दल सर्व काही स्पष्ट करण्यात आले आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे न पाळता केलेले व्यवहार बेकायदेशीर ठरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी बेकायदेशीर बीफ व्यवराहाला प्रोत्साहन देण्याऐवजी आपल्या खात्याचे काम पाहावे. लोकांना ४० रुपये एक या दराने नारळ विकत घ्यावे लागत आहेत. ते ५ रुपये या दराने प्रत्येक कुटुंबाला किमान ३० तरी पुरविण्याचे काम त्यांनी केले तर त्याचा लोकांना अधिक फायदा होईल आणि नारळ त्यांचे निवडणूक चिन्ह असल्यामुळे त्यांनाही फायदा होईल असे ते म्हणाले.
बेकायदेशीरपणे गोहत्त्या करणा-याला दोन लाख रुपये दंड व्हावा या मताचे असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एकदा बैठकीत बोलताना सांगितले होते. आपल्याच विचारांचे त्यांनी स्मरण करावे म्हणजे निर्णय घेताना गोंधळ उडणार नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
गोमंतकीय मोठ्या प्रमाणावर बीफ खात असल्याचे चित्र राजकारणी करीत आहेत ते चुकीचे असल्याचा दावा परब यांनी केला. गोव्यात मोठ्या प्रमाणावर असलेला हिंदू समाज हा बीफ खात नाहीत. शिवाय अनेक ख्रिस्ती बांधवही बीफ खात नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात गोरक्षकांवर जीवघेणे हल्ले होतात आणि उलट गोरक्षकांनाच बदनाम करण्याचा घाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत अमृत सिंग, शैलेंद्र वेलिंगकर, कमलेश बांदेकर आणि इतर नेते उपस्थित होते.