कडशी नदीचा प्रवाह बंद करू देणार नाही : जलस्रोत्र मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 04:17 PM2023-12-31T16:17:27+5:302023-12-31T16:18:34+5:30
राज्याच्या हद्दीत तांबोसे, मोपा, उगवे, फकिरपाटो आदी भागात नदीची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.
मोपा : तांबोसे, मोपा, उगवे या ग्रामपंचायत क्षेत्रातील भागासाठी कडशी नदीचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल, याचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. राज्याच्या हद्दीत तांबोसे, मोपा, उगवे, फकिरपाटो आदी भागात नदीची पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.
पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते गौरेश पेडणेकर, मोपाचे माजी पंचायत सदस्य उमेश गाड आदींच्या पुढाकारानंतर मंत्री शिरोडकर यांनी ही पाहणी केली. यावेळी पेडणे जलस्त्रोत कार्यालयाचे कार्यकारी अभियंते नाझारेथ वाझ, सहाय्यक अभियंता अनील परुळेकर, मनीष कांबळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर, तोर्से पंचायत सदस्य आत्माराम तोरसकर, उत्तम वीर, रमेश बुटे, मंगेश परब हे उपस्थित होते.
जलस्त्रोत मंत्री शिरोडकर म्हणाले की, कडशी नदीचा उगम महाराष्ट्राच्या हद्दीत पडले माजगाव येथे होतो. नदीचा जास्तीत जास्त भाग महाराष्ट्रात तर राज्याच्या हद्दीत सुमारे आठ किलोमीटर नदी वहाते. राज्याच्या हद्दीत या नदीवर तीन ते चार ठिकाणी बंधारे घातलेले आहेत. नदीचा आमच्या भागाला जास्तीत जास्त कसा फायदा करुन कसा करून घेता येईल, यासंबंधीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्राच्या हद्दीत नदीवर बंधारे घातले गेले असले तरी त्याचा परिणाम नदीच्या प्रवाहावर होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तशी उपाययोजना केली जाईल. महाराष्ट्र सरकारशी आमचे चांगले संबध आहेत. या नदीबाबत महाराष्ट्राच्या भागात काही समस्या निर्माण होत असल्यास त्या सरकारशी बोलून सोडवण्यात येतील.’