'गोव्यातील कला अकादमीची इमारत पाडणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 07:22 PM2019-07-29T19:22:05+5:302019-07-29T19:23:43+5:30
गोविंद गावडेंची विधानसभेत नि:संदिग्ध ग्वाही; केवळ करणार दुरुस्ती
पणजी : गोव्याची शान असलेली कला अकादमीची इमारत पाडली जाणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. यामुळे कला अकादमीच्या दुरवस्थेवरून केले जाणारे तर्कवितर्क आणि व्यक्त केल्या जाणाऱ्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला.
कला अकादमीचा पायाच ठिसूळ झाल्यामुळे काही भाग झाकलेला आहे. तसेच तेथे भरणारे वर्ग तसेच काही नियोजित कार्यक्रमांचे ठिकाण बदललेले आहे. या विषयावर माध्यमांत चर्चा सुरू आहे. यासंदर्भात गावडे यांनी स्पष्टीकरण दिले. कोणत्याही परिस्थितीत कला अकादमीची इमारत नष्ट केली जाणार नाही. त्या इमारतीबाबत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल मिळालेला आहे. अकादमीची यथोचित दुरुस्ती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कला अकादमी पाडून नवीन इमारत बांधली जाईल, असे शब्द मी कधीही वापरलेले नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. कला अकादमी पाडून इमारत बांधण्याची स्वप्ने कोणी पाहत असेल तर सरकार तसे होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
खारे पाणी, खारा वारा यामुळे अकादमीची थोडी हानी झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात जास्त त्रास होतो, अशी माहिती गावडे यांनी दिली. पावसाळ्यातच मराठी चित्रपट महोत्सव होत असतो. त्यासाठी महाराष्ट्रातील कलाकार मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात. अशावेळी पंपाद्वारे पाण्याचा सतत उपसा करून पाणी बाहेर काढावे लागते. ही वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी विनंती त्यांनी सभागृहाला केली.