एनडीएसोबत जाणार नाही, विरोधकांच्या 'इंडिया' युतीत सहभागी होण्याचा विचार करु: आरजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:52 AM2023-11-14T08:52:00+5:302023-11-14T08:54:15+5:30
भाजप आघाडी किंवा एनडीएसोबत जाणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रिव्होल्युनरी गोवन्स पक्ष (आरजी) कोणत्याही परिस्थितीत एनडीएसोबत जाणार लोकसभेत नाही. पक्षाचा खासदार निवडून आला तर नंतर विरोधकांच्या 'इंडिया' युतीत सहभागी होण्याबाबत विचार करू, असे पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी स्पष्ट केले.
येत्या लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका आरजीने घेतली आहे. एका चॅनेलशी बोलताना परब म्हणाले की, इंडिया युतीच्या निमंत्रणाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. परंतु, दुसरीकडे आम्ही लोकसभेसाठी आमची तयारीही सुरू केली आहे. गोव्यात आमचे खासदार निवडून आल्यास इंडिया युतीला आम्ही पाठिंबा देऊ. भाजप आघाडी किंवा एनडीएसोबत जाणार नाही.
परब म्हणाले की, २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणूक आरजीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध बेकायदा खनिज वाहतुकीच्या आरोपाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भाजप व काँग्रेस मिळून राज्याला कसे लुटतात हे आम्ही दाखवून दिले. हा ट्रेलर आहे. सिनेमा पुढेच आहे. हा हल्ला काँग्रेसवर नव्हे. दस्तऐवज आमच्या हातात होते. हवे तर लोकसभा निवडणुकीला पंधरा दिवस असताना आम्हाला भंडाफोड़ करता आला असता; परंतु आम्ही थांबलो नाही. पुढील सहा महिन्यांत भाजप व काँग्रेसचे साटेलोटे आम्ही लोकांसमोर उघड करू.
परब म्हणाले की, आरजीला इंडिया युतीची अॅलर्जी नाही. पण, निमंत्रणाची आम्ही वाट बघत राहावी का? भाजपसोबत आम्ही जाणार नाही. ज्या पक्षाने मानवी हक्क, लोकशाही संपवली. भाजप किंवा काँग्रेस खासदारांनी गोव्याचा एकही प्रश्न संसदेत मांडला नाही. स्थलांतरितांचे लोंढे, जमिनींचे प्रश्न, नोकऱ्या, कोळसा, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, ड्रग्स या विषयांवर आवाज उठवला नाही.