लोकांवरील कराचा बोजा कमी करणार; स्मार्ट प्रकल्पानंतर पणजी सुंदर होईल: रोहित मोन्सेरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 08:40 AM2024-11-15T08:40:03+5:302024-11-15T08:41:22+5:30
'लोकमत' कार्यालयास काल त्यांनी सदिच्छा भेट दिली व संपादकीय विभागाशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मी महापौर झाल्यापासून पणजी महापालिका क्षेत्रातील लोकांवरील कराचा बोजा कमी करण्याचाच प्रयत्न केला आहे. शिवाय विविध प्रकारे महापालिकेचा महसुल वाढविण्यावर भर दिला पण लोकांवर बोजा टाकला नाही. पणजी महापालिका क्षेत्रात सेवाकार्य करणे हेच माझे ध्येय आहे, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.
'लोकमत' कार्यालयास काल त्यांनी सदिच्छा भेट दिली व संपादकीय विभागाशी संवाद साधला. त्यांच्यासोबत किशोर शास्त्रीही उपस्थित होते. पणजीतील स्मार्ट सिटीची सर्व कामे एकदा पूर्ण झाल्यानंतर शहर खरोखर सुंदर व नीटनेटके दिसेल. मी केवळ प्रसिद्धी घेत फिरलो नाही. प्रत्यक्ष काम करण्यावर लक्ष दिले. आतापर्यंत दिवसरात्र काम केले. पण 'स्मार्ट सिटी'च्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामामुळे यात अडथळे आले. मात्र मी कराचा अतिरिक्त बोजा पणजीवासीयांवर टाकला नाही. शक्य झाले तेवढे कर कमी केले. यापुढील काळातदेखील करांचा बोजा टाकला जाणार नाही, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.
महापौर म्हणाले की, 'घर कर, कचरू कर उत्तर जे काही शक्य आहे. ते कर कमी करण्याचा प्रयत्न केला. पणजीतील व्यावसायिकांना मदत व्हावी, व्यवसाय वाढावा यासाठीदेखील करांचा अतिरीक्त ताण आणला नाही. महापौर झाल्यापासूनच मी हे धोरण राबविले, कर कसे कमी करता येतील यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.
मोन्सेरात म्हणाले की, शहरातील जुनी सांडपाणी वाहिनी बदलणे आवश्यक होती. स्मार्ट सिटी योजनेतून हे काम हाती घेतले आहे यामध्ये स्मार्ट सिटीसोबत सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, जीएसआयडीसी यांसारखे घटकही यावर काम करत आहेत. त्यामुळे स्वाभाविकरीत्या अनेक कंत्राटदारही नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व घटक आणि कंत्राटदारांत योग्य समन्वय होत नसल्याने अनेक समस्या उद्भवल्या. परंतु पुढच्या वर्षीपर्यंत ही कामे नक्कीच पूर्ण होतील. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरणदेखील केले जाईल.
आमदार होण्याची तूर्त इच्छा नाही
तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे, तुम्ही आमदार होऊ इच्छीता काय असा प्रश्न मोन्सेरात यांना विचारला असता ते हसले. मी ज्या ठिकाणी आज आहे, तिथेच खूश आहे. मला आमदारकीमध्ये सध्यातरी मुळीच इच्छा नाही. महापौर राहूनच लोकांची सेवा करायला मला आवडेल असे महापौर म्हणाले. 'आतापर्यंत मी पणजी आदर्श शहर बनविण्यासाठी काम केले आहे. यापुढेही तेच ध्येय असेल. प्रसिद्धिच्या झोतात राहून काम करायला आवडत नाही. मी पडद्यामागूनच काम करतो. शेवटी माझ्या प्रसिध्दिपेक्षा लोकांची सेवा आणि पणजीचा विकास महत्त्वाचा आहे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
उद्यानांवर विषेश लक्ष
'राजधानी शहरातील अनेक उद्याने महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे त्यांची देखरेख करणे आमची जबाबदारी आहे. चर्च स्क्चेअरमधील पालिकेच्या उद्यानाची काळजी घेण्यात येत आहे. करंझाळे उद्यानाची स्थिती खराब आहे. यासाठी निविदा काढण्यात आली आहे. लवकरच यातील कामे सुरू होतील. जिथे आवश्यकता आहे, तिथेही डागडूजी करण्यात येतील, गीता बेकरीसमोरील रोझ गार्डन आम्ही खुले केले होते. पण तिथे लोकांपेक्षा भिकारीच जास्त येऊ लागल्याने अखेर ते बंद करावे लागले', असेही मोन्सेरात यांनी सांगितले.
फेरीचा महसूल एक कोटींवर
मोन्सेरात म्हणाले की, पूर्वी अष्टमीच्या फेरीतून जास्तीत जास्त तीस लाख रुपयांचा महसूल महानगरपालिकेला मिळायचा. पण मी महापौर झाल्यापासून हा महसूल एक कोटी रुपयांपर्यंत पोहचविला. आज पालिकेला महसूल वाढीची गरज आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा ३.६ कोटी रुपये खर्च होतात. तेवढा महसूलही जमा होत नाही. पण लोकांवर जास्त बोजा न टाकता महसूल वाढीला प्राधान्य दिले आहे.
मासळी मार्केट स्थलांतर कायमस्वरुपी नाही
महापौर म्हणाले की, 'मासळी मार्केटचे स्थलांतर कायमस्वरुपी नाही, तर तात्पुरचे आहे. मासळी मार्केटची इमारत खुप जीर्ण झाली होती. ती केव्हाही कोसळली असती. जर मार्केट सुरू असताना ही कोसळली असती आणि काही दुर्घटना घटना घडली असती तर पुन्हा पालिकेलाच दोष देण्यात आला असता. सध्या जे केले, तो एकमेव उपाय होता. याबाबत आजूबाजूच्या दुकानदारांशी चर्चा करण्यात आली आहे. थोडीफार कळ तर सोसावीच लागेल.
मुलांसाठी एकच तास वेळ
'महापौर झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप बदल झाला. माझा दिवस पहाटे ५ वाजल्यापासून सुरू होतो' असे सांगून मोन्सेरात म्हणाले की, 'सफाई कर्मचारी योग्य प्रकारे काम करतात की नाही हे पाहण्यासाठी मी फेरफटका मारतो. मी जेव्हा घरी येतो तेव्हा मुले शाळेत गेलेली असतात. सायंकाळीदेखील कामाचा ताण असतो. सुट्टीच्या दिवसांत कार्यक्रम असतात. यातून दिवसभरात जेमतेम एखादा तास मुलांसोबत घालवायला मिळतो,' अशी खंतही मोन्सेरात यांनी व्यक्त केली.