माघार नाहीच, फुटिरांना धडा शिकवणारच : ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 10:32 PM2019-01-19T22:32:41+5:302019-01-19T22:35:13+5:30
शिरोडा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यावर ढवळीकर ठाम
पणजी : विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणातून आम्ही माघार घेणार नाहीच. कारण आमचा लढा हा फुटिरांविरुद्ध आहे. यापुढील काळात कुणाच आमदाराने अचानक आमदारकी सोडून मतदारांचा विश्वासघात करू नये म्हणून आम्ही रिंगणात उतरत आहोत. आपण शिरोडा मतदारसंघातून माघार घेऊ, अशी स्वप्ने कुठल्याच राजकीय पक्षाने पाहू नये, अशा शब्दांत मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी शनिवारी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.
मगो पक्ष हा भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. आमचे मगोपशी चांगले संबंध असून आम्ही ढवळीकर यांच्याशी चर्चा करू व त्यांना शिरोडातील पोटनिवडणुकीतून माघार घेण्यास सांगू असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर शनिवारी म्हणाले होते. त्याविषयी बोलताना माजी मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगो पक्ष कुठल्याच पक्षाबरोबर आता बोलणी करणार नाही. कारण शिरोडा मतदारसंघात आम्ही पोटनिवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांमध्ये फुटीरांचा पराभव होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वाभिमानी मतदारांनी फुटीरांविरुद्ध लढाई सुरू केली आहे. आम्ही मतदारांसोबत आहोत. पाच वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष बदलणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. मांद्रे व शिरोडामध्ये एकदा फुटिरांचा पराभव झाला की, मग कुणीच आमदार मतदारांचा कधी विश्वासघात करणार नाही. आमचा सरकारच्या स्थिरतेशी संबंधच येत नाही. आम्ही बोलणी वगैरे करायला येणार अशा स्वप्नात कुणी राहू नये. शिरोडा मतदारसंघातून मी पोटनिवडणूक लढवीन यावर मगो पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे, असे ढवळीकरांनी सांगितले.
शिवसेना व मगोमध्ये फरक : विनय
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की मगो पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना यांच्यात फरक आहे. मगो पक्ष कधीच चौकीदार चोर है असे म्हणत नाही. शिवसेना मात्र म्हणते. शिवसेना पंतप्रधान मोदी यांना दोष देते. मोदींविरुद्ध सेना बोलते. मगो पक्ष तसे बोलत नाही व मोदींना दोषही देत नाही. मगो पक्ष भाजपसोबतच राहील असा आम्हाला विश्वास आहे. आपण एकदा ढवळीकर यांना फोन केला होता पण त्यावेळी ते गोव्याबाहेर होते. मी तुम्हाला फोन करेन, असे ढवळीकर म्हणाले होते. त्यांच्या फोनची मी वाट पाहत आहे.