गणेश बेन्झो प्लास्टमधील नाफ्ता जहाजातून देशाबाहेर नेणार: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 09:08 PM2019-12-31T21:08:09+5:302019-12-31T21:08:17+5:30
मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक या जहाजात मंगळवारी (दि.३१) भरण्यात आलेला असून, सदर नाफ्ता लवकरच देशाबाहेर नेण्यात येणार आहे.
वास्को: दक्षिण गोव्यातील सडा येथील गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आलेला २३०० मेट्रीक टन नाफ्ता भूमिगत वाहिनीतून मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक या जहाजात मंगळवारी (दि.३१) भरण्यात आलेला असून, सदर नाफ्ता लवकरच देशाबाहेर नेण्यात येणार आहे. गोमंतकीयांची सुरक्षा व गोमंतकीयांच्या हितास गोवा सरकार प्रथम प्राधान्य देत असून भविष्यातही गोव्याच्या विकासासाठी सरकार पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘ट्विटर’वर संदेश घालून नमूद केले.
काही महिन्यांपूर्वी दोनापावला समुद्रात भरकटून गेलेल्या नू शी नलिनी जहाज पुन्हा मुरगाव बंदरात आणल्यानंतर यात असलेला सुमारे २३०० मेट्रिक टन नाफ्ता सडा येथील गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आला होता. गणेश बेन्झो प्लास्टच्या टाक्या सडा येथील लोकवस्तीच्या भागात असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरविकासमंत्री तथा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्यासहीत याभागातील बहुतेक नागरिकांनी गणेश बेन्झो प्लास्टच्या टाकीत नाफ्ता भरण्यास काही दिवसांपूर्वी विरोध दर्शविला होता. विरोध झाला असला तरी नू शी नलिनी जहाजातील नाफ्ता अखेर गणेश बेंन्झो प्लास्टच्या टाकीत भरण्यात आला होता. विरोध असताना नाफ्ता गणेश बेन्झो प्लास्टमध्ये भरण्यात आल्याने याबाबत विरोध करण्यात येत असल्याचे दिसून आले.
दरम्यान मंगळवारी (दि.३१) सकाळी गणेश बेन्झो प्लास्टच्या टाकीतील नाफ्ता मुरगाव बंदरात दाखल झालेल्या एमटी ग्लोबल पिक जहाजात भरण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, संध्याकाळपर्यंत सदर नाफ्ता त्या जहाजात भरण्यात आल्याचे सूत्रांनी कळविले. याच विषयावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून गणेश बेन्झो प्लास्ट टाकीतील नाफ्ता देशाबाहेर नेण्याच्या कामाला सुरुवात झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. एमटी ग्लोबल पिक या जहाजात सदर नाफ्ता भरून तो देशाबाहेर नेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात नमूद केले आहे. गोवेकरांची सुरक्षा व गोवेकरांचे हित हे गोवा सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे. सदर नाफ्ता बहारीन येथे समुद्र मार्गाने नेण्यात येणार असून, मंगळवारी रात्री हे जहाज मुरगाव बंदरातून जाण्यासाठी निघणार, अशी माहिती सूत्रांनी दिली.