जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 01:42 PM2024-04-21T13:42:46+5:302024-04-21T13:43:54+5:30

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे.

will teach politics to jit arolkar said dayanand sopte | जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

जीतला मी राजकारण शिकवीन: दयानंद सोपटे यांचा आश्वासक सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना आता मीच राजकारण शिकवेन, असा आश्वासक सल्ला माजी आमदार दयानंद सोपटे यांनी दिला आहे.

जीत यांनी आपल्याला मोठा भाऊ, असे संबोधले आहे. त्यांनी नुसते भाऊ म्हटले म्हणजे मी भाऊ होत नाही. तर ते नाते सांभाळण्याचीही गरज आहे. आता ते हे नाते खरंच सांभाळणार का? हेही त्यांनाच विचारावे, असा टोलाही सोपटे यांनी लगावला.

आमदार जीत आरोलकर हे भाजप सरकारला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या योजना तसेच विकासकामांचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे भाजपला मते त्यांनी द्यायलाच हवीत. त्यांनी आपल्याला मोठा भाऊ म्हटले आहे. आता मला मोठा भाऊ आहे. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आम्हा दोन्ही भावांमध्ये चांगले नाते आहे. आता जीतही मला भाऊ म्हणत असल्याने त्यांनी ते नाते सांभाळावे, असेही सोपटे म्हणाले.

भावाचे नाते ते सांभाळणार का? या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच विचारावे. मी मागील २५ वर्षांपासून राजकारणात आहे. आतापर्यंत चार निवडणूका जिंकल्या आहेत. त्यांना जर माझ्याकडून राजकारण शिकण्याची इच्छा असल्यास मी त्यांना ते शिकवेन. जीतचा भाजप सरकारला पाठिंबा आहे आणि मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत जर भाजपसाठी मते मागायची असल्यास आपण त्यांच्याकडे मते मागूच, असेही सोपटे यांनी नमूद केले.

राजकारण लोक शिकवतात : जीत आरोलकर

एका राजकारण्याला कधी दुसरा राजकारणी राजकारण शिकवत नसतो, तर लोकच शिकवत असतात. अनेकदा निवडणुकीवेळी सामान्य लोकच ते राजकारण व्यवस्थित शिकवतात, अशी प्रतिक्रिया आमदार जीत आरोलकर यांनी काल दिली. सोपटे यांच्या विधानाबाबत बोलताना आरोलकर म्हणाले की, सोपटे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत, असे मी अलीकडेच म्हटले होते. म्हणजे मी त्यांना योग्य तो मान दिला होता. मी आमदार आहे व ते माजी आमदार आहेत. मी त्यांच्या वयाचा वगैरे मान राखला होता. मात्र मी मान दिला तरी, समोरच्या व्यक्तीला जर तो स्वीकारता येत नसेल, तर मग त्याविषयी मी अधिक विचार करण्याची गरज राहत नाही. दुसऱ्याला आपण मान द्यायला हवा, असा संस्कार आमच्यावर घरातून झालेला आहे. त्यामुळेच मी सोपटेंना भावाची उपमा देऊन मान दिला; पण तो स्वीकारण्याकडे त्यांचा कल नाही. ते मला राजकारण शिकवण्याची भाषा करतात, असेही आरोलकर म्हणाले. 

वास्तविक मी आणि सोपटे यांनी एकत्र काम करून श्रीपाद नाईक यांना अधिकाधिक मते मांद्रे मतदारसंघातून देण्यावर सगळे लक्ष केंद्रित करायला हवे. मात्र सोपटे यांचे विधान ऐकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. जीतला सर्व सरकारी लाभ मिळतो. सरकार सर्व काही देते, असे विधान सोपटे करतात. आम्हाला भाजपने सरकार घडवताना सोबत घेतले आहे, हे सोपटे विसरतात. दुसऱ्याने दिलेला मान आपण स्वीकारायला हवा, हे सोपटे यांनी अगोदर शिकून घ्यायला नको काय, असा प्रश्न माझ्या मनात येतो. सोपटे यांच्याकडे (एकट्याकडे) मांद्रे मतदारसंघात जर पंधरा हजार मते आहेत, तर मग २०२२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना स्वतःला नऊ हजारच मते का पडली? असा प्रश्न जीतच्या समर्थकांनी केला आहे.

 

Web Title: will teach politics to jit arolkar said dayanand sopte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.