माजी मंत्र्याच्या प्रवेशाने समीकरणे बदलणार का? प्रचार फेरीच्या अखेरच्या टप्प्यात कितपत लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 09:38 AM2024-05-06T09:38:56+5:302024-05-06T09:40:05+5:30

त्यांचा खरेच प्रवेश झाला काय? याबाबतीत अजूनही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

will the entry of the former minister change the equation how much profit in the last phase of the campaign for goa lok sabha election 2024 | माजी मंत्र्याच्या प्रवेशाने समीकरणे बदलणार का? प्रचार फेरीच्या अखेरच्या टप्प्यात कितपत लाभ

माजी मंत्र्याच्या प्रवेशाने समीकरणे बदलणार का? प्रचार फेरीच्या अखेरच्या टप्प्यात कितपत लाभ

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क,फोंडा : २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर हे तसे राजकीय अज्ञातवासात गेले होते. राजकीयदृष्ट्या तरी त्यांची कुठेच हालचाल दिसत नव्हती; परंतु लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागतात त्यांची हालचाल जाणवू लागली होती. भाजपच्या नेत्यांच्या वाढदिवसाला भेटी देण्यासारख्या कार्यक्रमात ते दिसत होते. त्यामुळे ते भाजपच्या जवळ जाण्यासाठी इच्छुक आहेत, हे त्यांच्या देहबोलीवरून जाणवत आहे.

त्यांचा खरेच प्रवेश झाला काय? याबाबतीत अजूनही भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. एक माजी मंत्री ज्यावेळी प्रवेश करतो, निदान त्यावेळी एका चांगल्या कार्यक्रमात त्यांचा प्रवेश व्हायला हवा होता. ज्यावेळी मगोचे बालाजी गावस यांनी भाजप प्रवेश केला, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.

मुळात सावर्डे मतदारसंघाचा प्रचार कधीचाच संपलेला आहे. आमदार गणेश गावकर व एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. अशावेळी दीपक पावसकर यांचा प्रवेश नक्की का? हासुद्धा प्रश्न निर्माण होतो.

जुमानले नाही आणि दारुण पराभव...

२०२२च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी टाळताना नोकरभरती कारण देण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून भाजपतर्फे याचना करण्यात आल्या होत्या. दस्तरखुद्द मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून प्रयत्न केले होते. त्या वेळी दीपक पाऊसकर यांनी कुणालाच जुमानले नव्हते. मंत्री असल्याकारणाने त्या वेळी त्यांना वाटले होते की, संपूर्ण यंत्रणा त्यांच्या बाजूने राहील. कार्यकर्ते त्यांच्या बाजूने राहतील व ते सहज निवडून येतील. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी झाली व त्यांचा दारुण पराभव झाला. भाजपचा सहज पराभव करणार म्हणत असताना त्यांना फक्त ६६८० मतांवर समाधान मानावे लागले.

सात पंचायतींच्या ५७ पंचसदस्यांवर गावकरांचे वर्चस्व

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी आपली राजकीय परिक्रमा चालूच ठेवायला हवी होती. परंतु ते झाले नाही. आजच्या घडीला त्यांची राजकीय ताकद तशी नगण्य आहे. सावर्डे मतदारसंघात एकूण सात पंचायती येतात. सात पंचायतीमध्ये आज गणेश गावकर यांची सत्ता आहे. त्यातले बहुतांश पंच हे भाजपचे म्हणण्यापेक्षा गणेश गावकर यांच्या खास मर्जीतले आहेत. सात पंचायती मिळून एकूण ५७ पंच सदस्य आहेत. त्यापैकी फक्त तीन पंच आज पावसकर यांच्याबरोबर आहेत. साकोर्डा मतदारसंघातील अपक्ष पंच सदस्य महादेव शेटकर हेसुद्धा आज गणेश गावकर यांच्याबरोबर आहेत. पाऊसकर यांना निवडणूक प्रचार बंद होण्याच्या वेळी सोबत घेऊन भाजपने नेमके काय साध्य केले हे पुढच्या काळात कळून येईल. मात्र लोकसभेसाठी त्यांचा तसा काहीच फायदा भाजपला होणार नाही. कारण, येथे विरोधक नावालाच आहेत.

 

Web Title: will the entry of the former minister change the equation how much profit in the last phase of the campaign for goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.