पर्यटकांचा छळ थांबेल? गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:02 PM2023-02-14T13:02:22+5:302023-02-14T13:02:44+5:30
संपादकीय: एखाद्या राज्यात पर्यटक येतात तेव्हा त्या राज्याला सर्व बाजूंनी फायदा होत असतो.
गोव्यात पर्यटकांना खूपच त्रास दिला जातो. याविरुद्ध कडक कारवाईची गरज आहेच. मंत्री रोहन खंवटे यांनी पुढाकार घेऊन उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत कारवाई मोहीम सुरू केली हे दिलासादायक आहे. एखाद्या राज्यात पर्यटक येतात तेव्हा त्या राज्याला सर्व बाजूंनी फायदा होत असतो. आर्थिक उपक्रमांना चालना मिळते. महसूल प्राप्ती होते, शिवाय छोटे विक्रेते, रेस्टॉरंट व्यावसायिक, टॅक्सी व्यावसायिक या सर्वांना पर्यटकांमुळे व्यवसाय मिळतो. पर्यटक माघारी परतताना गोमंतकीयांविषयी चांगली प्रतिमा घेऊन गेले तर त्याचा अधिक लाभ राज्यालाच होतो.
गोव्यातील पुढील पिढ्यांसाठीही ते लाभदायी ठरेल. दुर्दैवाने अलीकडील काळात पर्यटकांना कटू अनुभव जास्त येऊ लागले आहेत. पर्यटकांना छळणारी गिधाडे काही पोलिस दलांमध्येही आहेत व काही रॉक व्यावसायिक, रेस्टॉरंट व्यावसायिक यांच्यामध्येही आहे. गोव्यात खाण धंदा यापूर्वी बंद पडला, कारण या धंद्यातील काहीजणांचा अतिलोभ ठरावीक कंपन्यांनी अतिलोभाने गोव्याला लुटले परिणामी, क्लॉड अल्वारिस यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. पर्यटन व्यवसाय ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मात्र, गिधाडांना रोखले नाही तर ही कोंबडीच एक दिवस मृत्युमुखी पडेल.
पर्यटकांचा छळ, किनाऱ्यावरील बेकायदा गोष्टी, डेक बेड्स टाकून किनाऱ्यांवर केली जाणारी अतिक्रमणे याबाबत आपण झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारले आहे, असे खंवटे यांनी काल जाहीर केले. खंवटे यांना स्वतःला हॉटेल व्यवसायाचा अनुभव आहे. त्यांना पर्यटन हा विषय नवीन नाही. ते पर्यटनमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक नवे उपक्रम सुरू झाले आहेत. त्याबाबत शंकाच नाही, पण वाईट एवढेच वाटते की, विद्यमान सरकार अजूनही पर्यटकांत सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकलेले नाही. गोव्याकडे मोठ्या संख्येने पोलिस आहेत. या पोलिसांना रस्त्यावर ठेवून पर्यटकांची लुबाडणूक केली जाते.
महाराष्ट्र, कर्नाटकची गाडी दिसली की, अडवली जाते. कागदपत्रे नाहीत असे सांगून वाहतूक पोलिस किंवा अन्य पोलिसही त्यांना छळतात. गोव्याच्या पोलिस खात्यातील वरिष्ठांचे हे मोठे अपयश आहे. वारंवार याविषयी आवाज उठवूनही पर्यटकांची वाहने अडविणे थांबलेले नाही. कळंगुटहून पणजी व पणजीहून जुनेगोवे आणि तिथून पुढे फोंड्याला जाताना पोलिस किती पर्यटकांची वाहने अडवतात हे स्वतः पाहण्यासाठी एक दिवस मुख्यमंत्री सावंत व मंत्री खंवटे यांनी गुप्तपणे रस्त्याच्या बाजूला उभे राहावे. दुचाक्या घेऊन जे पर्यटक फिरतात, त्यांना पर्रा रस्त्यावर तसेच शिवोली चोपडे भागात तसेच मेरशी जंक्शनकडे उगाच थांबविले जाते. उत्तर व दक्षिण गोव्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, पण तिथली वाहतूक व्यवस्था नीट करण्याकडे पोलिसांचे लक्ष नाही. तालांव देणे किंवा चिरीमिरी उकळणे याकडेच लक्ष आहे. गृहखात्याने पर्यटकांचा छळ त्वरित थांबवावा.
किनाऱ्यांवर डेक बेड्स घालून अतिक्रमणे केली जातात, त्यामुळे फिरताना व्यत्यय येतो ही गोष्ट खरी आहे. मात्र, आता कारवाई केली म्हणजे कायम किनारे मोकळेच राहतील असे म्हणता येत नाही. खंवटे यांनी सातत्याने कारवाई मोहीम हाती घ्यावी. दलालांकडून पर्यटकांना लुटले जातेच. टॅक्सी व्यावसायिकांशी निगडित प्रश्न वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो अजून सोडवू शकलेले नाहीत. आपल्याला गोव्यात टॅक्सी परवडतच नाही असे देशी-विदेशी पर्यटकही सांगतात. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याने रस्त्यावर वाहतूक खूप वाढली आहे. नव्या टॅक्सी व्यावसायिकांचीही संख्या वाढेल. मात्र, पर्यटकांची लूटमार होणार नाही याची काळजी पर्यटन खात्यालाच घ्यावी लागेल. वाहतूक खाते त्याबाबत अपयशी ठरले आहे. सर्वत्र भिकाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.
अगदी पणजीच्या १८ जून रस्त्यापासून कळंगुट ते मोरजीपर्यंतच्या किनाऱ्यांपर्यंत सगळीकडे भिकारी दिसतात. लहान मुलांना कडेवर घेऊन भिकारी फिरतात. पर्यटकांना त्यांच्यापासून खूप उपद्रव होतो. त्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम पर्यटन खात्याने पोलिसांकडून करून घ्यावे. हॉटेलांमध्ये पर्यटक आपले मौल्यवान सामान ठेवतात. मात्र, खोलीतून हे सामान चोरट्यांकडून किंवा वेटर्सकडून पळविले जाते. हे सगळे गैरप्रकार थांबले नाहीत तर गोव्यात पर्यटकांची संख्या भविष्यात कमी होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"