पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् अमित शाह यांच्या सभांचा भाजपला फायदा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 11:19 AM2024-05-05T11:19:33+5:302024-05-05T11:20:36+5:30
काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे?
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा भरवल्या, काँग्रेसच्या वतीने मात्र त्या तोडीचे कुणीही आले नाही. भाजपला मोदी व शाह यांच्या सभांचा फायदा होईल का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाबोळीत सभा झाली. सभा यशस्वी करण्यासाठी भाजपचे मंत्री व आमदारांना पक्षाने कामाला लावले होते. त्यामुळे सभेसाठी मोठी गर्दी झाल्याने पंतप्रधान सुद्धा खुश झाले; मात्र म्हापसा येथील अमित शाह यांच्या सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजेच मोदींच्या सभेइतका प्रतिसाद मिळाला नाही, असे काही राजकीय जाणकारांचे मत आहे.
म्हादई, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर वक्त्यांनी बोलणे टाळले. यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलित मिळाले. भाजपला उत्तर गोव्यातून मागील २५ वर्षे श्रीपाद नाईक यांच्या रुपात खासदार मिळत आहेत. नाईक हे केंद्रात राज्यमंत्री देखील आहेत; मात्र भाजपला उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्याची चिंता अधिक आहे. कारण दक्षिण गोवा त्यांना काबीज करायचा आहे. यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून त्यातूनच म्हणे दक्षिण गोव्यात त्यांनी पंतप्रधानांची सभा ठेवली. पंतप्रधानांच्या सभेला ५० हजार लोक आणायचे टार्गेट पक्षाने ठेवले होते.
शाह यांच्या सभेसाठी ३५ हजार लोक आणायचे टार्गेट होते; परंतु ठरलेला आकडा गाठता आला नाही. मंत्री व आमदारांचे प्रयत्न यात कमी पडल्याचीही चर्चा दिसून आली. भाजपला मात्र मोदी व शाह यांच्या सभांमुळे गोव्यात फायदा होईल, असे वाटत आहे. कारण सध्या भाजपला प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्याचे मतांमध्ये रूपांतर होण्याबाबत पक्षाच्याच नेत्यांना खात्री आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे?
निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी गोव्यात येतील, अशी अपेक्षा होती; मात्र शशी थरूर, अलका लांबा, प्रभारी माणिकराव ठाकरे असे दुसऱ्या फळीतील पक्षाचे नेते आले. त्यांच्या सभाही झाल्या नाहीत. इंडिया आघाडीच्या प्रचारात केवळ स्थानिक नेतेच दिसून आले. त्यामुळे काँग्रेसचे स्टार प्रचारक कुठे? असा प्रश्न मुख्यमंत्री सावंत हे देखील मुद्दाम विचारतात.