काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटतील का टिकतील? ८ मतदारसंघांत ४५ टक्के मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 01:28 PM2024-05-03T13:28:03+5:302024-05-03T13:28:47+5:30
सासष्टीत भाजपाचे प्रयत्न.
सुरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुक्याने काँग्रेसची कास कधीच सोडलेली नाही, हा आजवरचा इतिहास आहे. तरीही इतिहास यावेळी बदलण्याचा विडा भाजपाने उचलला आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसची एकगठ्ठा मते फुटणे शक्य आहे का? काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भाजपा भगदाड पाडण्यास यशस्वी ठरेल का? की पूर्वीसारखाच हा तालुका यावेळीही काँग्रेसचीच साथ देईल? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तालुक्यात मडगाव, फातोर्डा, बाणावली, नुवे, कुडतरी, नावेली, वेळ्ळी व कुंकळ्ळी असे आठ मतदारसंघ आहेत. दक्षिण गोव्यात ५ लाख ९५ हजार मतदार असून, या आठ मतदारसंघांत त्यातील ४५ टक्के मतदार आहेत. कुंकळ्ळी काँग्रेसचे युरी आलेमाव हे आमदार आहेत, तर वेळ्ळी व बाणावलीत आपचे कुझ सिल्वा व वेन्झी व्हिएगस आमदार असून, फातोड्र्ध्यात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे आमदार आहेत. हे सर्वजण इंडिया आघाडीचे घटक आहेत, तर दुसरीकडे मडगावात दिगंबर कामत, नुवेत आलेक्स सिक्वेरा व नावेलीत उल्हास तुयेंकर हे भाजपाचे आमदार आहेत.
रेजिनाल्ड, सिक्वेरा यांची कसोटी
कुडतरी मतदारसंघात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिलेला आहे. भाजपाच्या प्रचारसभेत ते सहभागी झालेले आहेत. दिगंबर कामत यांच्यासारखा मोहरा भाजपाने आपल्याकडे ओढून घेतल्याने मडगावात या पक्षाची स्थिती कधीही नव्हे, इतकी बळकट झाली. फातोर्डा मतदार संघातही भाजपाची एकगठ्ठा मते आहेत. त्यातच दिगंबर कामत यांना मानणारा एक गट जो एरव्ही भाजपा नाही, त्यांचीही मते यावेळी मिळण्याची या पक्षाला आशा आहे.
भाजपा मनपरिवर्तन करू शकेल का?
या तालुक्यातील ख्रिस्ती मतदार हा पारंपरिक काँग्रेस मतदार आहेत. आतापर्यंत त्यांनी अपवाद वगळता काँग्रेसलाच साथ दिलेली आहे. या मतदारांना भाजपा आकर्षित करण्याचा प्रयत्नही करत आहे. मनोहर पर्रीकर यांनी 'मिशन सालसेत' राबविले होते. तर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे या तालुक्यातील अनेक ख्रिस्ती लोकांच्या सातत्याने संपर्कात असतात. थोडीफार मते जरी भाजपाला मिळाली तर ती या पक्षासाठी एक मोठी गोष्ट ठरणार आहे.