कार्निव्हलला गोव्यात खरेच पर्यटक येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 05:56 AM2021-02-13T05:56:41+5:302021-02-13T05:56:50+5:30

मडगाव : गोव्यात सरकारी पातळीवर यंदा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड असतानाही ...

Will tourists really come to Goa for the carnival? | कार्निव्हलला गोव्यात खरेच पर्यटक येतील?

कार्निव्हलला गोव्यात खरेच पर्यटक येतील?

Next

मडगाव : गोव्यात सरकारी पातळीवर यंदा १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. कोविड असतानाही पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उत्सव आयोजित करणे महत्त्वाचे असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणतात. मात्र एका बाजूने कोविडची भीती आणि दुसऱ्या बाजूने विमान तिकिटाचे वाढलेले दर यामुळे यावेळी गोव्यात खरेच पर्यटक येतील का हा खरा प्रश्न  आहे.

कार्निव्हल नव्हे इंत्रुज
गोव्यात पारंपरिक रित्या जो उत्सव साजरा केला जातो त्याला इंत्रुज असे म्हणतात. गोव्यातील पारंपरिक उत्सवात चित्ररथ मिरवणुकीला थारा नाही. गोव्यात आधी या उत्सवाच्या वेळी वेगवेगळे पोशाख परिधान करून मिरवणुका काढायचे. ज्यात पुरुष महिलांच्या वेशातही असायचे. अंगणातील खेळ हा या उत्सवाचा मुख्य भाग होता.

खा, प्या, मजा करा
गोव्यात तीन दिवसांचा कार्निव्हल साजरा केला जात असला तरी यावेळी सरकारी पातळीवर तो दोन दिवसच साजरा होणार आहे. या तीन दिवसांत गोव्यात खा, प्या आणि मजा करा असा माहोल असेल. त्यानंतर गोव्यात लेंट महिना सुरू होतो. या महिन्यात ख्रिस्ती लोक दारू व मांस सेवन करत नाहीत. त्यापूर्वी मजा करण्यासाठी हा सण.

चर्चचा नेहमी विरोध
कार्निव्हलचा ख्रिश्चनांच्या धार्मिक कार्याशी दुरान्वयेही संबंध नाही. १९८०च्या दशकात गोव्यात ब्राझील कार्निव्हलच्या धर्तीवर चित्ररथ मिरवणुका सुरू झाल्या आणि त्यातून अर्धनग्न महिलांना सादर करण्यास सुरुवात झाल्यावर चर्चने याला विरोध केला. याच्या व्यावसायिकीकरणाला आजही चर्चचा विरोध आहेच.
कार्निव्हल पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ही गोष्ट खरी असली तरी यावेळी विमान तिकिटांचे दर तीन पटीने वाढले आहेत.

गोव्यात अजूनही कोविडचे रुग्ण आढळून येत असल्याने हा गर्दी करणारा उत्सव नको. त्यापेक्षा पारंपरिक खेळांना प्राधान्य द्या अशी मागणी होत आहे. पण पर्यटनाचा  मुद्दा पुढे करून हा उत्सव होणारच असा दावा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी केला. मंत्र्यांना कमिशन मिळते अशी टीका विरोधकांनी केली आहे.
 

Web Title: Will tourists really come to Goa for the carnival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.