कलेच्या वृद्धीसाठी जे करता येतील ते प्रयत्न करणार: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:44 AM2023-12-02T10:44:02+5:302023-12-02T10:45:20+5:30
गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनाला प्रतिसाद.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : सरकार दरबारी कलेच्या वृद्धीसाठी जे काही करता येईल, ते आम्ही करत आलो आहोत. यापुढेसुद्धा करत राहू, असे उद्गार जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
फर्मागुडी येथे पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ३५व्या स्वरसम्राज्ञी गिरीजाताई केळेकर संगीत संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयंत मिरींगकार, संजय घाटे, गो.रा. ढवळीकर, नारायण नावती, नरेंद्र तारी व्यासपीठावर उपस्थित होते. आजच्या युवा गायकांनी संगीत संमेलनातून स्फूर्ती घ्यावी. अशाच संमेलनांमधून अनेक कलाकार घडलेले आहेत. भविष्यातही असे कलाकार घडत राहतील. गोव्याची समृद्ध संगीत परंपरा आमच्या गायकांनी अशीच पुढे न्यावी, असेही शिरोडकर म्हणाले. वैष्णवी शिरोडकर यांनी गायलेल्या स्वागत गीताने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. स्वरांजली या स्मरणनिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
गोमंतकाच्या भूमीत प्रत्येकामध्ये संगीत कला भिनलेली
मंत्री शिरोडकर पुढे म्हणाले, गोमंतकाच्या भूमीत प्रत्येकामध्ये संगीत कला भिनलेली आहे. इथल्या कलाकाराने संगीत शिकले व संगीताचे संगोपनसुद्धा केले आहे. गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम आमच्या दिग्गज संगीतकारांनी केले आहे. कोणतेही संमेलन होत असताना त्या गौरवशाली नावाचा उल्लेख हा व्हायलाच हवा. जेणेकरून नव्या पिढीला प्रेरणा मिळत जाईल. काही लोकांना संगीत शिकायची आंतरिक इच्छा असते; पण परिस्थिती पुढे त्यांना शिक्षण घेता येत नाही; परंतु, आज आम्ही साधन सुविधा निर्माण केल्या आहेत. ज्या कुणाला संगीताची आवड आहे त्यांनी संगीत शिक्षण शिकण्याची संधी सोडू नये, असेही ते म्हणाले.
संगीत योगदान पुरस्कार रामकृष्ण सूर्लकर यांना
संमेलनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी तीन पुरस्कार देण्यात येतात. या वेळेचा कलाप्रेमी पुरस्कार देवेंद्र वालावलीकर यांना तर संगीत योगदान पुरस्कार रामकृष्ण सूर्लकर यांना तर पं. जितेंद्र अभिषेकी पुरस्कार यांना देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार अभय जोशी, सारेगमप लिटल चॅम्प स्टार ऋषिकेश ढवळीकर यांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.