गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू - अमित शाह
By किशोर कुबल | Published: April 16, 2023 08:12 PM2023-04-16T20:12:43+5:302023-04-16T20:13:05+5:30
वर्षभरात खाण व्यवसाय सुरु होईल.
पणजी : सावंत सरकारने केंद्राच्या मदतीने खाणींचा विषय सोडवला. पुढील वर्षभरात गोव्यातील खाणी सुरु होतील, असे आश्वासन गोमंतकीयांना देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील जाहीर सभेत आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा दावा केला.
फर्मागुडी, फोंडा येथे विराट सभेत बोलताना शाह यांनी गोव्याला स्थिर सरकार दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शाह यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले कि, गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा आम्हाला हुकली. परंतु यावेळी कार्यकर्त्यंाकडून मी आश्वासन घेतलेले आहे की, यावेळी ही जागा निश्चितच भाजप जिंकणार.’
शाह म्हणाले कि,‘मी जेव्हा जेव्हा गोव्यात येतो. तेव्हा तेव्हा मन खुश होते. गोवा हा इवलासा प्रदेश भारतमातेच्या माथ्यावरील टिकली आहे. गोवेकरांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करुन आम्ही पुन्हा जनतेसमोर येऊ.’ शाह पुढे म्हणाले की, केंद्रात कॉंग्रेसची सत्ता असताना गोव्याला केवळ ४३२ कोटी रुपये मिळत होते. आता भाजपच्या कारकिर्दीत हा निधी ३ हजार कोटींवर पोचला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,‘ गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप या अनुसूचीत जमातींच्या लोकांनी चिंता करण्याचे कारण नाही. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या जमातींना विधानसभेत राजकीय आरक्षण देऊ. मुख्यमंत्र्यांनी असाही दावा केला की, आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार आहे.