३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:02 AM2023-10-26T10:02:38+5:302023-10-26T10:03:27+5:30

मतदारसंघनिहाय योजना, कामाचा घेतला आढावा.

will win both the lok sabha seats with the support of 33 mla cm claim | ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा 

३३ आमदारांच्या पाठिंब्यावर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू; मुख्यमंत्र्यांचा दावा 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : भाजपचे २८, मित्रपक्ष मगोपचे २ व अपक्ष ३ मिळून ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. दक्षिण गोव्याची जबाबदारी असलेले केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी सर्व आमदारांची बैठक घेतली. अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स गोव्याबाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीसाठी आता केवळ १६० दिवस राहिले आहेत. त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळाले. मतदारसंघनिहाय कशा पद्धतीने पुढे जाता येईल व दोन्ही मतदारसंघ कसे जिंकता येतील याबाबत चर्चा झाली.'

मुख्यमंत्री म्हणाले, 'गोव्यात केंद्र सरकारच्या योजना ९९ टक्के कुटुंबांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि लोकांचा भाजपला पाठिंबा आहे. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्या मतदारसंघात विविध कामे चालू आहेत. त्याचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या मदतीने आगामी दोन-तीन महिन्यांत हाती घ्यावयाच्या विकास प्रकल्पांवरही चर्चा झाली. गोवा देशातील पहिले डिजिटल राज्य बनविण्याचा आमचा मानस आहे. केंद्राकडे त्यासाठी वेगळा निधीही आम्ही मागितला आहे.'

निवडणुकीनंतर उमेदवारी : तानावडे

उमेदवार निश्चित झाले आहेत का, असे विचारले असता प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा भाजप खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले, भाजपची उमेदवार निवडीसाठी पद्धती आहे. त्यानुसार राज्य निवडणूक समिती नावांची शिफारस केंद्रीय संसदीय मंडळाकडे करील आणि नंतर उमेदवार निश्चित केला जाईल. हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणार आहे.' पत्रकार परिषदेस उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगोपचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर हेही उपस्थित होते.

दहा वर्षात गोव्याचा कायापालट : चंद्रशेखर

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, 'डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास जलदगतीने होऊ लागला आहे. गोव्यात युवकांमध्ये कौशल्य विकासासाठी जो उपक्रम सरकारने चालवला आहे, तो उल्लेखनीय आहे. गेल्या दहा वर्षांत गोवा राज्यात आणि देशभरात कायापालट झालेला आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून जगभरातील पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये बसवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. जनतेने भाजपचा विकास पाहिला आहे. त्यामुळे दोन्ही जागा भाजपलाच मिळतील, याबद्दल दुमत नाही.

 

Web Title: will win both the lok sabha seats with the support of 33 mla cm claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.