दसरा गेला, दिवाळीत भाव मिळेल का? स्थानिक झेंडू उत्पादक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 11:35 AM2023-10-27T11:35:59+5:302023-10-27T11:36:19+5:30
योग्य दर नसल्याने मोठे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: दसरा, दिवाळीला झेंडूच्या फुलांना मागणी असते. दसरा यंदा नुकसानीत गेला, आता दिवाळीला तरी या फुलांना चांगला दर मिळेल का? अशी अपेक्षा काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सरकार, कृषी खाते शेतकऱ्यांना कृषीसाठी प्रोत्साहन देते. पण जेव्हा शेतकरी उत्पादन घेतो, तेव्हा त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी उत्पादन घेण्यास फार प्राधान्य देताना दिसत नाहीत.
मागील काही वर्षे झेंडूच्या फुलांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत असल्याने यावर्षी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड शेतकऱ्यांनी केली. यंदा सुमारे १२५ मेट्रिक टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन मिळणार, असा कृषी खात्याचा अंदाज होता. पण, दसऱ्याला स्थानिक झेंडू उत्पादकांना चांगला दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी भावच मिळाला नसल्याने झेंडूची फुले शेतात फेकण्याची वेळ आली आहे.
आवक वाढल्याने भाव नाही
कृषी खात्याने शेतकऱ्यांना ४ रुपयांना एक रोपटे दिले होते. तसेच अनुदानही दिले होते. यामुळे अनेक युवा शेतकऱ्यां पुढे येऊन आपल्या पडीक जमिनीवर झेंडूच्या फुलांची लागवड केली तसेच पावसाचा यंदा झेंडूच्या फुलांवर परिणाम जाणवला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन मिळाले. पण, उत्पादनात वाढ झाल्याने दर मात्र घसरला. यावर्षीही परप्रांतीयांनी ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने झेंडूची फुले विकली. यामुळे स्थानिक झेंडू उत्पादकांना व शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला.
अपेक्षित भाव न मिळाल्याने झेंडू फुलांच्या लागवडीचे नुकसान झाले. कृषी खात्याकडून नुकसानभरपाई देण्याची अजून तरतूद नाही. शेतकऱ्यांना झेंडूची रोपटी लावण्यासाठी अनुदान दिले जाते. गोव्यातील बहुतांश शेतकऱ्यांची झेंडूची फुले अगोदर काही जणांकडून आरक्षित केली जातात. - नेव्हील आफान्सो, कृषी संचालक.
कृषी खात्याने कमी दरात रोपटी दिल्याने आम्ही आमच्या पडीक जमिनीवर झेंडूंच्या फुलांची लागवड केली होती. गेल्या वर्षी चांगला भाव मिळाला. पण, यावर्षी झेंडूची आवक खूप वाढल्याने चांगला दर मिळाला नाही तसेच परप्रांतीय झेंडू विक्रेत्यांनी कमी दरात फुले विकली. त्याचा फटका आम्हाला
बसला. - बाबूसो गावकर, शेतकरी, धारबांदोडा.