जिंकल्याने बळ वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:43 PM2023-05-09T14:43:30+5:302023-05-09T14:44:43+5:30

फोंडा व साखळी पालिकेच्या निवडणुकांचा निकाल कालच्या रविवारी लागला.

winning brings strength in goa for bjp in municipal election | जिंकल्याने बळ वाढले

जिंकल्याने बळ वाढले

googlenewsNext

फोंडा व साखळी पालिकेच्या निवडणुकांचा निकाल कालच्या रविवारी लागला. भाजपने अपेक्षेहून जास्त यश मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. पूर्ण गोव्याला भाजपने विस्मयचकित केले आहे. कर्नाटकात मतदान होण्यापूर्वीच गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दोन पालिकांच्या निकालामुळे खूप वाढला आहे. या घवघवीत यशासाठी भाजपचे अभिनंदन करावेच लागेल. राज्यात टिकून राहण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाला यापुढे खूप कष्ट घ्यावे लागतील, असा संदेश या निकालाने दिला आहे. काँग्रेसकडे राज्यस्तरीय असे प्रभावी नेतृत्वच नसल्याने स्थानिक स्तरावरीलच काँग्रेस समर्थक उमेदवारांना मर्यादित कुवतीनुसार पालिका निवडणुकीत लढावे लागले. ते हरतात की जिंकतात हेदेखील काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांनी निवडणूक काळात विचारले नसेल.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी साखळी व फोंडा पालिका निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. तानावडे यांच्यामुळेच भाजपची मते वाढली असे जरी म्हणता येत नसले, तरी प्रदेशाध्यक्ष प्रचारात स्वतःला झोकून देतात हे पाहूनच कार्यकर्त्यांचा हुरूप वाढतो. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते होते तेव्हा तेही पालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी स्वतःला झोकून देत होते. काँग्रेसच्या युरी आलेमाव यांना हे कौशल्य कदाचित ठाऊकही नसेल. काँग्रेस पक्ष विरोधात असतो तेव्हा त्या पक्षाला पंचायत व पालिका निवडणुकांतही मोठासा रस नसतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात येणाऱ्या साखळी नगरपालिकेची निवडणूक यावेळी जास्त चुरशीची ठरली. 

मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रकारची रणनीती वापरली. त्यांच्या विरोधकांच्या हाती पालिका राहणे हे त्यांच्या पदाला कमीपणा आणणारे होते. धर्मेश सगलानी यांच्या गटाने कायम मुख्यमंत्री सावंत यांच्याशी संघर्ष केला. पालिका विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष साखळी शहराच्या विकासासाठी मारक ठरत होता. यावेळी सगलानी- प्रवीण ब्लेगन यांच्या गटाचा दारुण पराभव झालाच. शिवाय स्वतः सगलानीही 30 मतांनी पराभूत झाल्याने मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे बळ चारही बाजूंनी वाढले. सगलानी हेच सावंत यांना विधानसभा निवडणुकीतही आव्हान देत होते. सगलानी आता वॉर्डातही निवडून न आल्याने मुख्यमंत्र्यांची छाती फुलली असेलच. मंत्रिमंडळातही मुख्यमंत्र्यांचे वजन वाढले, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येईल. 

साखळी पालिका निवडणुकीत विरोधकांचा विजय झाला असता तर काही मंत्र्यांना सुप्त व छुपे समाधान वाटले असते हे वेगळे सांगायला नको. फोंडा पालिका निवडणुकीवेळी तुलनेने स्थिती वेगळी होती. कृषिमंत्री रवी नाईक गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये आल्याने फोंड्यात भाजपची शक्ती सर्व बाजूंनी वाढलीच होती. रवी नाईक काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचे मूळ कार्यकर्ते व समर्थक आणि खींचे कार्यकर्ते व समर्थक यांचे बळ एकत्र आले. शक्तीचा गुणाकार झाला. काही मूळ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांचे रुसवेफुगवे आहेतच, पण त्यामुळे रवींची हानी झाली नाही. रवी नाईक यांना मुस्लिम व ख्रिस्ती मतदारांमध्येही पाठिंबा आहे. भाजपला ज्या मुस्लिम धर्मीयांची मते मिळत नाहीत, ती मते रवी नाईक यांना फोंड्यात मिळतात. मडगावमध्ये दिगंबर कामत व फोंड्यात रवी नाईक यांनी अल्पसंख्याकांची मते भाजपकडे वळवली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत रवींसमोर मगो पक्षाचे केतन भाटीकर यांचे कडवे आव्हान होते. रवी त्यावेळी कसेबसे जिंकले. काही भाजपवाल्यांनी छुप्या पद्धतीने
रवींच्या स्वप्नाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला होता, हा वेगळा विषय. 

साखळीत मुख्यमंत्री सावंत यांचे वजन कमी करण्याच्या हेतूने काँग्रेस समर्थकांनी आपले पॅनल उभे केले होते. सरकारने अगोदर पालिका प्रभागांची फेररचना व आरक्षण हे स्वतःला हवे तसे करून घेतले होतेच. विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी भाजप सरकार दरवेळी पंचायत, झेडपी व पालिका निवडणुकांवेळी असा खेळ खेळतच असते. भाजपने पालिका निवडणुकीत सर्वच नीती वापरली. धमक्या दिल्याचेही आरोप झाले. सरकारी नोकऱ्या देण्याचीही आश्वासने दिली गेली. शेवटी जो जिता वही सिकंदर. फोंड्यात रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र आता नगरसेवक झाले आहेत. दोन्ही पालिकांचा कारभार सुधारो एवढीच अपेक्षा.

 

Web Title: winning brings strength in goa for bjp in municipal election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.