बदललेल्या वातावरणामुळे हिवाळा लांबणीवर पडण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 08:16 PM2017-10-22T20:16:56+5:302017-10-22T20:17:26+5:30
पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही.
पणजी - पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असल्यामुळे लोकांना प्रतीक्षा आहे ती थंडीची. परंतु अद्याप वा-याची दिशा ही नैऋत्य - इशान्य अशीच असल्यामुळे गोव्याला परतीचा पाऊसही मिळाला नाही आणि उत्तरेहून सुटणारा गार वाराही मिळाला नाही.
एकूणच ऋतुचक्रातच आमुलाग्र बदल व्हावा अशी परिस्थिती असून, वेळेवर मान्सुनचे आगमन, वेळेवर मान्सूनचे परतणे आणि वेळेवर देशातून हटणे या गोष्टी तर अलिकडील ८ वर्षांत झालेल्या नाहीत. वेळ चुकणे आणि तोही एक दोन दिवसांनी नव्हे तर तब्बल २० ते २५ दिवसांचा फरक पडतो आहे. विशेष करून परतीच्या मान्सूनच्या बाबतीत हा विलंब अधिकच होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे. पावसाच्या उशिरा आगमनामुळे परतणे उशिरा होते. उशिरा परतल्यामुळे गोव्यात उशिरा पोहोचतो आणि संपूर्ण हटणेही उशिरा होते. १ जूनला होणारे पावसाचे आगमन ८ जून नंतर होत आहे आणि १ सप्टेंबरला राजस्थानहून परतणारा पाऊस आता १५ सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू करतो. गोव्यातही उशिरा पोहोचतो आणि देशातून पूर्णपणे हटण्यासाठीही विलंब लागतो. त्यामुळे आॅक्टोबर महिना संपायला आला तरी हिंवाळा लागल्याच्या खाणाखुणाही दिसत नाहीत. हे सर्व मान्सून पुढे सरकल्यामुळे होत असल्याचा हवामान खात्याचा निष्कर्श आहे.
परतीचा पाऊस महाराष्ट्रातच
महाराष्ट्रात दाखल झालेला परतीचा पाऊस अद्याप गोव्यात पोहोचला नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. १५ आॅक्टोबर रोजी परतीचा पाऊस महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर व पश्चीम भागात पोहोचला होता. तसेच १६ ते २० आॅक्टोबरपर्यंत तो आणखी दक्षीणेला सरकून पूर्वेला तेलंगणा व इतर भागापर्यंत पोहोचला होता. गोव्यात पोहोचण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील अशी अपेक्षा आहे. मात्र या बाबत हवामान खाते काहीच अंदाज वर्तवित नाही. हवामान खात्याकडून केवळ परतीच्या पावसाच्या सामान्य तारखा आणि प्रत्यक्ष परतीचा पाऊस दाखल झालेल्या तारखा दिल्या जात. गोव्यात सामान्य तारीख आहे १ आॅक्टोबर.