पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:53 AM2023-06-07T11:53:15+5:302023-06-07T11:54:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क केपे : पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत. आता नव्याने गोव्याची उभारणी करण्यासाठी पोर्तुगीज राजवटीच्या गोव्यातील सर्व खाणाखुणा पुसून टाका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेतूल- केपे येथील किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आम्ही वसाहतीवादाचे अवशेष नष्ट करून नवीन गोवा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. किल्ल्याचा नमुना तयार करण्यासाठी बेतूल येथील अडीच हजार चौरस मीटर जमीन कस्टम विभागाकडून पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली जाईल. किल्ल्याला पुरातत्व असे महत्त्वाचे स्मारक म्हणून अधिसूचित केले जाईल, असेही ते म्हणाले.
या सोहळ्याला पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विकसित गोव्यासाठी एकत्र या
पोर्तुगीजांनी केलेल्या खाणाखुणा पुसून परत एकदा आपली संस्कृती जिवंत करण्याची वेळ आली आहे. एकीकडे आम्ही 'आजादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत तर दुसरीकडे आपल्या राज्याचा साठावा मुक्तीदिन. विकसित भारत आणि विकसित गोवा याला बळ देण्यासाठी एकत्र येऊया. ज्यावेळी भारत देशाला शंभर वर्षे पूर्ण होणार तेव्हा गोमंत प्रदेश कसा असणार? याची उभारणी आपण आतापासूनच केली पाहिजे. त्यासाठी आपली मूळ संस्कृती समोर आणली पाहिजे. यासाठी पोर्तुगिजांच्या राजवटीतील खाणाखुणा आता पुसून टाकण्याची वेळ आल्याचा पुरुच्चार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.
आमदार डिकॉस्टा म्हणाले, की या ठिकाणी सर्व भेद विसरून आपण सर्व शिवप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत. या किल्ल्याचे महत्त्व आपण जपले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री सुभाष फळदेसाई यांनीही अल्टन यांच्या सुरात सूर मिळविताना सांगितले की किल्ल्याचे महत्त्व आणि किल्लाही राखला जाईल. या ठिकाणी एक हॉटेल बांधण्याचे प्रयत्नही मागे सुरु होते. ते सरकार कधीही होऊ देणार नाही असे ते म्हणाले.