गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 08:24 AM2024-05-23T08:24:28+5:302024-05-23T08:25:09+5:30

मुख्यमंत्र्यांकडून दखल

with criticism from goa recruitment cancelled in mumbai | गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

गोव्यातून टीका होताच, मुंबईतील 'भरती' रद्द; औषध कंपनीला नोकरभरतीवरून विरोधकांनी दिला 'डोस'

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: राज्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या इंडिको रेमेडीज या औषधनिर्मिती कंपनीने प्रकल्पात नोकरभरतीसाठी बोईसर-महाराष्ट्र येथे मुलाखती ठेवल्याने गोव्यात एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या या भरतीविरोधात गोवा फॉरवर्डसह आप, आरजी व काँग्रेसच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर कंपनीने मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला.

बुधवारी सायंकाळी कंपनीने ती जाहिरात रद्द केल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. वेर्णा येथील इंडोको रेमेडीज या औषध कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रातील बोईसर येथे मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध करताच सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यातील विरोधी पक्षांनी कंपनीसह सरकारवर टीका करत निषेध व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने शेवटी संबंधित कंपनीने ही नोकरभरती प्रक्रिया रद्द केल्याचे पत्र दिले. 

दरम्यान या मुद्द्यावरून गोवा फॉरवर्ड, आरजी पक्षाने संताप व्यक्त करत राज्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर पुन्हा जोर दिला.

स्थानिकांना प्राधान्य हवेच

गोमंतकीयांना खासगी उद्योगातील नोकऱ्यांत ८० टक्के आरक्षण मिळावे यासाठी गोवा फॉरवर्ड वेळोवेळी विधानसभेतही आवाज उठवत आहे. खासगी उद्योगांना गोमंतकीय युवकांना नोकऱ्या न देण्यापासून रोखण्यास सरकारला अपयश आले आहे. गोव्यातील युवकांना रोजगारात प्राधान्य देणारी धोरणे सरकारने लागू केली पाहिजेत. तसेच या युवकांना पुरेसे कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

नोकरभरतीवर सरकारचा अंकुश हवा

काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी फार्मा कंपनी गोव्यात प्लांट सुरू करून महाराष्ट्रात नोकरभरती आयोजित करते यावर सरकारचा अंकुश नसल्याची टीका केली. हा गोमंतकीय तरुणांवर होत असलेला अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील प्रचार सोडून राज्यातील या समस्यांवर लक्ष घालावे. राज्यातील काही खासगी कंपन्या आपल्याला हवी तशी नोकरभरती करत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी केली होती.

'आरजी'कडून निषेध

वेर्णा येथील इंडिको रेमेडीज कंपनीने नोकरभरतीसाठी महाराष्ट्रात मुलाखती घेण्याच्या निर्णयाचा 'आरजी'चे अध्यक्ष मनोज परब यांनीही निषेध केला आहे. भाजप सरकारने गोव्यातील नोकऱ्या परप्रांतीयांना विकल्याचा आरोप परब यांनी केला. कंपनीने विविध पदांसाठी २५ रोजी बोईसर-मुंबई येथे मुलाखती ठेवल्या आहेत. कंपनी गोव्यात असताना भरती प्रक्रिया महाराष्ट्रात केल्यावरून परब यांनी टीका केली आहे. सरकारने गोमंतकीय तरुणांना बेरोजगार करण्याचा कट रचल्याचा आरोपही परब यांनी केला.

 

Web Title: with criticism from goa recruitment cancelled in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा