मंत्री, आमदारांच्या पत्नींना उमेदवारी नको! राज्यातील नेत्यांना पक्षश्रेष्ठींची स्पष्ट सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 09:53 AM2024-03-06T09:53:02+5:302024-03-06T09:53:59+5:30
आता भाजपकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजप सुशिक्षित महिला उमेदवाराचा शोध घेत असला तरी मंत्री, आमदारांच्या पत्नीचे नाव तिकिटासाठी पाठवू नका, अशी स्पष्ट सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्याने अशी काही नावेही आपोआप बाद ठरत आहेत. त्यामुळे आता भाजपकडून महिला उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
सोमवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक प्रभारी विनय तेंडुलकर यांनी पाच नावे वाचून दाखवली, त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा, सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर यांच्या नावाचाही समावेश होता. तेंडुलकर यांनी ही नावे केवळ वाचून दाखवली होती, बैठकीत या नावांवर चर्चा वगैरे झाली नाही.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांना मंत्री, आमदारांच्या पत्नींची नावे नको, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. परंतु सुलक्षणा सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
गोव्यात दाखल झालेले भाजप प्रभारी आशिष सूद याची भेट घेण्यासाठी सुलक्षणा सावत काल, मंगळवारी सायंकाळी पक्षाच्या येथील मुख्य कार्यालयात दाखल झाल्या, पत्रकारांनी त्यांना विचारले असता उमेदवारीसाठी वगैरे ही भेट नसून ही बैठक पूर्वनियोजित असल्याचे त्या म्हणाल्या, आज, युधवारी नारी शक्ती वंदन संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना संबोधणार आहेत. हा कार्यक्रम देशभरात ९ हजार ठिकाणी स्क्रीन बसवून दाखवला जाणार आहे. तसेच पदयात्राही होणार आहे. गोव्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रभारी आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर सध्या पेंगीण पंचायतीच्या सरपंच आहेत. तसेच बलराम शिक्षण संस्थेच्या आमोणे येथील श्री बलरान निवासी शाळेच्या त्या मुख्याध्यापिकाही आहेत. निवडणुकीत त्या पहिल्यांदाच रिंगणात उतरल्या व निवडून येऊन सरपंचही बनल्या. त्यांचे नावही तेंडुलकर यांनी जी पाच नावे घेतली त्यात होते.
पक्षाने उमेदवारी दिल्यास दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून लढणार का?, असे विचारले असता सुलक्षणा म्हणाल्या की, सोमवारी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले आहे. या व्यतिरिवत्त मला काही बोलायचे नाही. जो काही निर्णय असेल तो पक्ष घेईल.