गोमेकाॅत महिलेचा मृत्यू; मात्र कोरोनाची बाधा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:43 PM2020-03-29T20:43:05+5:302020-03-29T20:43:14+5:30
महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. तथापि,तिला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता.
पणजी : बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मात्र तिची वैद्यकीय चाचणी केली व पुणेहून तिच्याविषयी अहवालही आला. तिला करोनाची लागण झाली नव्हती हे त्या अहवालातून स्पष्ट झाले.
महिलेने गोव्याबाहेर प्रवास केला नव्हता. तथापि,तिला श्वासोच्छ्वासाचा त्रास होता. त्यामुळे तिची कोरोना चाचणी केली गेली होती. तिला स्वतंत्र विभागात निगराणीखाली ठेवले गेले होते. तथापि तिच्या चाचणीचा अहवाल पुण्याहून रविवारी सायंकाळी आला. तिला करोना झाला नव्हता हे स्पष्ट झाले.
आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी रविवारी ट्विट करून रविवारी सकाळी थोडी माहिती दिली होती.
68 वर्षीय महिलेला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत होता. तिला सीओपिडी संसर्ग असल्याचे नंतर गोमेकाॅत आढळून आले. तिला गोमेकाॅच्या आयसोलेशन विभागात ठेवले गेले होते. ती कोरोनाबाधित नाही हे ताज्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनीही पत्रकारांना सांगितले.
एखादी व्यक्ती जर कोरोनामुळे वारली असे सिद्ध झाले तर त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे वेगळ्या पद्धतीने करावे लागतात. त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांकडे देता येत नाही. खूप काळजी घ्यावी लागते असे मुख्यमंत्री म्हणाले.