फुगे विकता विकता तिने विकले ड्रग्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:40 PM2018-01-25T22:40:52+5:302018-01-25T22:41:05+5:30
गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे.
पणजी - गरीब बिचारी, फुगे विकून आपली उपजिविका चालविते असे कालपरवापर्यंत ज्या महिलेकडून पाहून लोक म्हणत होते ती महिला आज ड्रग्स विकण्याच्या प्रकरणात पणजी पोलिसांच्या कोठडीत आहे.
या महिलेचे नाव ललिता पवार (३०)असे असून कांपाल पणजी येथील बालभवनाच्या विरुद्ध असलेल्या रस्त्याच्या बाजूला फुगे विक्री करताना ती लोकांना दिसत होती. तिच्याबरोबर आणखी काही मंडळीही दिसायची. तिचे ते कुटुंबिय असल्याचे पोलीस सांगतात. फुगे एकाच जागी राहून विकत होते असेही नव्हते. ती शहरात सगळीकडे फिरत होती. परंतु बहुतेक वेळा कांपाल येथे दिसायची. तेथेच ती राहत होती. गुरूवारी ती अशीच फुगे विकण्यासाठी म्हणूनच पणजी बाजाराच्या ठिकाणी गेली होती. तेथील हॉटेल सुशेगादोजवळ ती गि-हायिकाची वाट पाहत उभी होती. परंतु हे गि-हायिक फुग्यांसाठी नव्हते तर गांजासाठी होते हे नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघड झाले. तिच्याकडे ५० हजार रुपये किंमतीचा गांजा सापडल्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली.
ती मूळची पंढरपूर येथील असून मागील ब-याच काळापासून ती पणजीलाच होती. तिच्या बरोबर तिचे कुटुंबही आहे आणि त्यात पुरूष मंडळीही आहे. त्यातील एकाला असेच एकदा अशाच प्रकारच्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी अक केली होती. ही महिला फुगे विकत असली तरी काही तरी संशयास्पद व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनीच व्यवस्थीत सापळा रचून तिला रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.