गॅस सिलिंडर दरवाढीवर गोव्यात महिला काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 06:18 PM2018-10-23T18:18:13+5:302018-10-23T18:18:24+5:30

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा-या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर दरवाढीच्या प्रश्नावर गोव्यात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक बनल्या आहेत. शहरात या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

Women Congress agitation on gas cylinders price hike in goa | गॅस सिलिंडर दरवाढीवर गोव्यात महिला काँग्रेस आक्रमक

गॅस सिलिंडर दरवाढीवर गोव्यात महिला काँग्रेस आक्रमक

googlenewsNext

पणजी : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणा-या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर दरवाढीच्या प्रश्नावर गोव्यात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक बनल्या आहेत. शहरात या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलक महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस हाऊससमोर रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन आंदोलकांना मागे ढकलले त्यानंतर त्या पांगल्या व काँग्रेस हाऊसमध्ये त्यांनी आश्रय घेतला. येत्या आठ दिवसात दरवाढ कमी न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

दरवाढीचा निषेध म्हणून दोन गॅस सिलिंडरही आंदोलक महिलांनी आणले होते. हातात काँग्रेसचे झेंडे देत सरकारविरोधी घोषणाबाजी करीत या महिला कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन त्यांनी मोर्चा काढला. जेवणासाठी वापरली जाणारी स्टीलची ताटे, स्टीलच्या प्लेट वाजवित सुमारे दीडकेशे महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या त्यानंतर फेरीबोट धक्क्यासमोर रस्त्यावर बसून सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने काही वेळ कोंडी निर्माण झाली. पोलीस दाखल झाल्यावर आंदोलक महिला काँग्रेस हाउससमोर आल्या. तेथे दोन्ही रस्त्यांवर वाहतूक अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक सिध्दांत शिरोडकर यांनी आंदोलकांना हटविण्याचा आदेश दिला. या महिलांना पोलिसांनी मागे ढकलले असता काहीवेळ किरकोळ झटापट झाली परंतु नंतर आंदोलक महिला पांगल्या काहींनी काँग्रेस हाऊसमध्ये आश्रय घेतला. 

निरीक्षक शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा काँग्रेस हाऊसजवळ तैनात करण्यात आला होता. महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना दरवाढ मागे घेण्यास आठ दिवसांची मुदत दिली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कुतिन्हो म्हणाल्या की, ‘ घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ९00 रुपयांवर पोचला आहे. राज्य सरकारने काही भार आपण सोसावा आणि सिलिंडरवर सबसिडी देऊन लोकांना कमी दरात ते उपलब्ध करावेत. गेल्या महिनाभराच्या कालावधीतच सिलिंडरचा दर तब्बल ५९ रुपयांनी दर वाढल्याचा दावा करताना त्यानी असेही सांगितले की, सध्या ८९६ रुपये दर असला तरी ९00 रुपये आकारले जातात.’

गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या दरवाढीचा पाढाच त्यांनी वाचला. त्या म्हणाल्या की, जानेवारीत सिलिंडरचा दर ७५२ रुपये होता. जुलैमध्ये तो ७७१ वर पोचला त्यानंतर गेल्या महिन्यात ८४0 झाला. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. गृहिणींचे बजेटच त्यामुळे हलले आहे.’

महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव अ‍ॅड. दिया शेटकर, सावित्री कवळेकर, महिला काँग्रेसच्या उत्तर जिल्हाध्यक्ष वैशाली शेटगांवकर, प्रदेश सचिव उर्मिला नाईक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. 

Web Title: Women Congress agitation on gas cylinders price hike in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.