धक्कादायक! आरोग्य केंद्रातल्या महिलांच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 09:08 PM2020-02-07T21:08:07+5:302020-02-07T21:10:51+5:30
संशयितावर गुन्हा नोंद; पोलीस तपास सुरू
मडगाव: महिला कर्मचाऱ्यांच्या चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना महिलांचे स्मार्टफोनद्वारे छायाचित्रे व व्हिडीओ चित्रण करण्याची एक धक्कादायक घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रारही नोंद झाली आहे. ज्योकिम फिगुरेदो असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३५४ (सी) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात ही किळसवाणी घटना घडली आहे.
याप्रकरणी त्या आरोग्य केंद्राच्या डॉक्टराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. १ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. काही महिला परिचारिका चेंजिंग रुममध्ये जाऊन कपडे बदलत असताना, संशयित त्या खोलीच्या वेंटिलेशनमधून मोबाईलद्वारे छायाचित्र तसेच व्हिडीओचित्रण करत होता. महिला कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी यासंबंधी आपल्या प्रमुखाकडे तक्रार केली. मागाहून यासंबंधी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर संशयितावर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील पोलीस तपास चालू आहे.