नवरात्रकाळात राज्याला महिला पोलिसांचे 'कवच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 10:51 AM2024-10-04T10:51:10+5:302024-10-04T11:00:23+5:30
पिंक फोर्सची महत्त्वाची भूमिका, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नवरात्रोत्सव काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी महिला पोलिसांनीच उचलली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पिंक फोर्ससह सर्वच महिला पोलिसांशी संवाद साधला. यावेळी सुरक्षेबाबत आखण्यात आलेल्या या नव्या उपाययोजनेची महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी पोलिस मुख्यालयाला भेट देऊन महिला कॉन्स्टेबलपासून अधीक्षकांपर्यंतच्या सर्वच महिला पोलिसांशी संवाद साधला. यावेळी महिला अधीक्षक सुनीता सावंत, सुचेता देसाई, एझिल्डा डिसोझा तसेच सर्व महिला पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि इतर महिला पोलिस उपस्थित होत्या.
नवरात्रोत्सव काळात अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबा नृत्याचे कार्यक्रम होतात. अशावेळी समाजविघातक प्रवृत्तींना रोखण्यासाठी महिला पोलिसांकडून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्थेसंबंधी काहीही प्रसंग उद्भवला तर तो कसा हाताळावा याबद्दल सर्व तयारी ठेवण्यात आली आहे. विशेषतः पिंक फोर्सची या कामात महत्त्वाची भूमिका राहणार आहे. याची सर्व माहिती महिला पोलिस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. नवरात्रौत्सवात पोलिस प्रशासनाने राज्यभरात केलेल्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेत काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महिला पोलिसांशी साधलेल्या ३० मिनिटांच्या संवादात महिला पोलिसांच्या क्षमतेचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले. महिला या महिलांच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. शिवाय फिल्डवर काम करताना पुरुषांपेक्षा कुठेही कमी पडत नाहीत. पिंक फोर्सच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. सुरक्षेचे प्रबंध म्हणून ज्या काही योजना त्यांनी बनविल्या आहेत, त्याची अंमलबजावणी तितक्याच चांगल्या पद्धतीने होईल याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. एका महिला अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा संवाद केवळ एकतर्फी नव्हता तर महिलांनीही मुख्यमंत्र्यांशी मुक्त संवाद यावेळी केला.
जागृती करणार
ही व्यवस्था नवरात्रोत्सवासाठी करण्यात आली असली तरी त्यानंतरदेखील ही यंत्रणा कार्यरत राहील, असे एका महिला अधिकाऱ्याने सांगितले. शाळा व महाविद्यालयांतही जाऊन सुरक्षेविषयी जागृती करण्याचा या उपक्रमात समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांच्या या योजनेचे कौतुक केले आहे.
अत्याचारांना बसणार आळा
महिला पोलिसांशी संवाद साधल्यानंतर पोलिस मुख्यालयातून बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी नवरात्रोत्सवानिमित्त पिंक फोर्ससह महिला पोलिसांशी झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगितले. त्यांची तयारी पाहून आपण विश्वासाने सांगू शकतो की या नव्या उपाययोजनेमुळे महिलांवरील अत्याचारांना आळा बसणार आहे.