महिला आरक्षण ही नव्या युगाची नांदी; भाजप महिला मोर्चाकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 02:35 PM2023-09-23T14:35:57+5:302023-09-23T14:36:59+5:30
महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती.
पणजी : केंद्र सरकारने संमत केलेले महिला आरक्षण विधेयक म्हणजे नव्या युगाची सुरुवात आहे. यामुळे महिलांना राजकीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे असे प्रतिपादन प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची मागणी ही बऱ्याच वर्षापासूनची प्रलंबित मागणी होती. केंद्रातील भाजप सरकारने ती मान्य करुन महिलांना त्यांनी सन्मान दिला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार असे त्या म्हणाल्या. सावंत म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला महिला आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. मात्र कॉंग्रेस तसेच काही पक्ष त्याला विरोध करीत आहेत. या आरक्षणाद्वारे महिलांना राजकारणात येण्याची संधी मिळणार आहे. लोकसभा निवडणूका जवळ आल्याने हे आरक्षण जाहीर केल्याची टीका विरोधक करीत आहेत. मात्र तसे नसून उलट भारत स्वतंत्र झाल्याच्या ७५ वर्षानंतर आरक्षणाच्या माध्यमातून भाजप सरकारने महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आरक्षणामुळे महिला सशक्तीकरणाला अधिकच बळकटी मिळाल्याचे सावंत यांनी नमूद केले.
शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो म्हणाल्या, 'महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे ही अनेक वर्षापासूनची मागणी भाजप सरकारने पूर्ण केली आहे. यामुळे महिलांना राजकारणात येण्यासाठी अधिकच संधी मिळेल. त्यादृष्टीने महिला आरक्षण महत्वाचे आहे. विधानसभेच्या महिला आमदारांची संख्या २०२७ च्या निवडणूकीत १३ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर व अन्य
उपस्थित होते.
विजयादेवी राणे यांच्याकडून स्वागत
महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झाल्याने गोवा बाल भवनच्या माजी अध्यक्षा विजयादेवी राणे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अनेक सरकारांच्या अनेक पंतप्रधानांनी हे विधेयक आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते अपुरे का पडले, हे अजून मला कळलेले नाही. परंतु केवळ पंतप्रधान मोदी यांनी हे काम करून दाखवले. हा लोकशाहीचा फार मोठा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा देशातील सर्व महिलांचा विजय आहे असे त्यांनी म्हटले आहे.