महिला आंदोलकांच्या घरी जाऊन मानसिक छळ
By Admin | Published: March 13, 2015 12:54 AM2015-03-13T00:54:11+5:302015-03-13T00:54:35+5:30
पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा
पणजी : येथे गेले अनेक दिवस आंदोलन करणाऱ्या १0८ कर्मचाऱ्यांमधील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचा मानसिक छळ करणाऱ्या जीव्हीकेच्या दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुरुवारी डिचोली व पेडणे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांकडून घडलेल्या या प्रकारावर सरकारने गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
जीव्हीके व्यवस्थापन सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांमध्ये फूट घालण्याचे प्रयत्न करत आहे. काही कर्मचाऱ्यांना निलंबित पत्रे पाठविली. काहींना घरी जाऊन धमक्या दिल्या. महाराष्ट्रातील महिला कर्मचाऱ्यांनाही फोनद्वारे धमक्या देण्यात आल्या. मात्र, कर्मचारी एकोपा सोडत नसल्याने व आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता महिला कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देणे व त्यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनांच्या कर्मचाऱ्यांकडून होऊ लागला आहे, असे संघटनेचे सचिव सागर प्रभुदेसाई यांनी सांगितले.
याबाबत डिचोली येथील १0८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या सोनाली शिरोडकर यांना जीव्हीकेचे कर्मचारी सूरज नाईक व रफीक यांनी घरी जाऊन त्रास दिला. शिरोडकर यांना आंदोलनात सहभागी न होता पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी ते आग्रह करीत होते. नाईक व रफीक ज्या वेळी शिरोडकर यांच्या घरी गेले होते, तेव्हा घरात कुणी नसल्याने शिरोडकर यांनी शांतपणे सगळे ऐकून विचार करून सांगते, असे सांगून त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तसेच पेडणे येथील रुग्णवाहिका कर्मचारी प्रमिला पेडणेकर यांच्या घरी जाऊन त्यांनाही धमकी देण्यात आली. सूरज नाईक व रफीक हे ज्या वेळी प्रमिला यांच्या घरी पोहोचले तेव्हा घरात प्रमिला व तिची आठ वर्षांची मुलगी होती. प्रमिलालाही आंदोलनात सहभागी असल्याने मानसिक त्रास देण्यात आला. त्यानंतर प्रमिला यांनी नाईक व रफीक यांच्याविरोधात पेडणे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
दरम्यान, येथे आंदोलनाला बसणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनाही आता व्यवस्थापनाकडून होत असलेल्या त्रासाबाबत भीती वाटू लागली आहे. आंदोलनकर्ते राज्यातील विविध गावांतून ये-जा करत असताना त्यांच्या जीवाला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न ते विचारत आहेत. सरकारने या विषयावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असून पुढील तीन दिवसांत या विषयावर तोडगा काढण्यात येत नसेल तर सोमवारपासून आमरण उपोषणाला बसण्याची तयारी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
(प्रतिनिधी)