Women’s Day 2019 : अनोखी हौस! कुंभारजुवेंतील महिला कलाकार आठ वर्षे सादर करताहेत नाट्यप्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 12:23 PM2019-03-08T12:23:31+5:302019-03-08T13:00:09+5:30

गोवा ही रंगभूमी कलाकारांची खाण असे मानले जाते. महिलाही यात मागे नाहीत. गोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे. 

Women’s Day 2019 : mahadev devasthan mahila mandal Cumbarjua goa | Women’s Day 2019 : अनोखी हौस! कुंभारजुवेंतील महिला कलाकार आठ वर्षे सादर करताहेत नाट्यप्रयोग!

Women’s Day 2019 : अनोखी हौस! कुंभारजुवेंतील महिला कलाकार आठ वर्षे सादर करताहेत नाट्यप्रयोग!

googlenewsNext
ठळक मुद्देगोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे.गेल्या आठ वर्षात या महिला कलाकारांनी  विविध भागात ऐतिहासिक, पौराणिक, संगीत नाटके सादर केलेली आहेत.मंडळाकडे 20 महिला कलाकार आहेत, ज्या आपले दैनंदिन घरकाम, नोकऱ्या हा सगळा व्याप सांभाळून केवळ हौसेपोटी नाटकांमध्ये काम करीत आहेत.

पणजी : गोवा ही रंगभूमी कलाकारांची खाण असे मानले जाते. महिलाही यात मागे नाहीत. गोळवाडा, कुंभारजुवे येथील हौशी महिला कलाकारांनी एकत्र येऊन महादेव देवस्थान महिला मंडळ स्थापन केले आहे. गेल्या आठ वर्षात या महिला कलाकारांनी  विविध भागात ऐतिहासिक, पौराणिक, संगीत नाटके सादर केलेली आहेत.

अलीकडेच या मंडळाने कुंभारजुवे येथे ‘धाडीला राम तिने का वनी’ या पौराणिक संगीत नाटकाचा प्रयोग केला. या मंडळाकडे 20 महिला कलाकार आहेत, ज्या आपले दैनंदिन घरकाम, नोकऱ्या हा सगळा व्याप सांभाळून केवळ हौसेपोटी नाटकांमध्ये काम करीत आहेत. नाटकातील सर्व पात्रांची भूमिका या महिलाच वठवित असतात. या सर्व नाटकांचे दिग्दर्शन गुरुनाथ राजाराम तारी यांनी केले आहे तर संगीत दिग्दर्शक म्हणून महाबळेश्वर भोसले जबाबदारी सांभाळत आहेत.

मंडळाच्या माजी अध्यक्ष, हौशी नाट्य कलाकार सौ. रेषा राजेंद्र चोडणकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, ‘केवळ हौसेपोटी आम्ही पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटकांमध्ये काम करतो.’ रेषा यांनी आजपावेतो अनेक भूमिका केल्या आहेत. ‘धाडिला राम तिने का वनी’ या नाटकात त्या दशरथाची भूमिका वठवत आहेत. ‘सिंहाचा छावा’ या नाटकात त्यांनी 'दुर्योधन' साकारला आहे तर अन्य एका नाटकात त्यांनी द्रोणाचार्यांची भूमिका उत्कृष्टपणे वठविली आहे. या हौशी नाट्यमंडळाच्या कलाकृतींची सर्वत्र वाहवा होत आहे. केवळ कुंभारजुवेतच  नव्हे तर बेतकी-फोंडा, वळवई तसेच परिसरात मंडळाने विविध नाट्यप्रयोग सादर केले आहेत. 

नाटकाचे प्रयोग रात्री उशिरापर्यंत चालतात त्यामुळे या महिलांना आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागते. घरातील कामाचा आवाका, नोकरी असे सर्व सांभाळून नित्यनेमाने तालमींना हजर रहावे लागते. सौ. रेषा म्हणाल्या की, नाट्यप्रयोगासाठी लांब लांबहून ऑफर येतात परंतु आम्ही त्या स्वीकारत नाही कारण सर्व कलाकार महिला असल्याने सुरक्षेचाही प्रश्न आहे. 

रेषा या मूळच्या चोडण गावातील आहेत. लग्न होऊन त्या कुंभारजुवेंत आल्या. रंगमंचावर काम करण्याची आपल्याला लहानपणापासूनच हौस होती त्यामुळे आपण नाट्यक्षेत्रात झाल्याचे त्या सांगतात. या मंडळाने अलीकडेच बसविलेल्या ‘धाडीला राम तिने का वनी’ या नाटकात सौ. रेषा यांनी दशरथाची भूमिका वठविली आहे. या नाटकात राम- सौ. सोनिया सोमनाथ शेट, शत्रुघ्न- सौ. संगीता विशांत शेट, सुमंत - सौ. दर्शना दीनानाथ वळवईकर, लक्ष्मण- सौ. अनिता सत्यवान शेट, भरत- सौ. निर्मला गुरुनाथ तारी, सीता- सौ. पूजा सुजित शेट, कैकयी- सौ. सुनयना सुनील नाईक, अवदालिका - कु. हेमलता फडते, दासी- कु. दिव्या नाईक, सारथी- कु. अनुष्का चोडणकर यांनी भूमिका वठवल्या आहेत.

Web Title: Women’s Day 2019 : mahadev devasthan mahila mandal Cumbarjua goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.