मतभेद संपवून चांगल्या पद्धतीने काम करा; श्रेष्ठींचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2024 08:55 AM2024-10-01T08:55:20+5:302024-10-01T08:57:18+5:30
दिल्लीतील संबंधित सुत्रांकडून रात्री 'लोकमत'ला माहिती मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील दोन्ही नेत्यांनी आपापसांतील मतभेद संपवावेत व चांगल्या प्रकारे काम करावे, राज्य कारभार सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने पुढे न्यावा, असा सल्ला भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिला असल्याची माहिती दिल्लीतील संबंधित सुत्रांकडून रात्री 'लोकमत'ला मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात विविध विषयांवरून संघर्ष सुरू आहे. याची कल्पना भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आली होती. त्यामुळे काल, सोमवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रातील एक मंत्री जे. पी. नड्डा यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक बोलविण्यात आली होती. रात्री साडेआठ वाजता बैठक होती पण ती उशिरा सुरू झाली. मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे यांनी बैठकीत भाग घेतला. दोन्ही नेते साडेआठ पूर्वीच बैठकीच्या ठिकाणी पोहचले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनीही बैठकीत भाग घेतला.
गोव्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहीमेबाबतही चर्चा झाली, मेगा हाऊसिंग आदी प्रकल्पांवरून सुरू असलेली आंदोलने यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नोकर भरती प्रक्रियेतील काही अडथळे, काही मतदारसंघातील लोकांना नोकऱ्या न मिळण्याचे प्रकार अशा विषयांवरही चर्चा झाल्याचे समजते
बैठकीचा तपशील कुणीच उघड केला नाही. केंद्रीय नेत्यांनी दोन्ही नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही नेत्यांनी संघर्ष न करता चांगल्या प्रकारे काम पुढे न्यावे, असा सल्ला नेतृत्वाने दिला. गोवा मंत्रिमंडळ फेररचनेचा सध्या प्रश्न नाही हेही स्पष्ट झाले.