विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्यामागचे कारण शोधण्याच्या कामाला सुरुवात
By पंकज शेट्ये | Published: November 28, 2023 05:50 PM2023-11-28T17:50:14+5:302023-11-28T17:51:07+5:30
विहिरीपासून ९०० मीटर दूर अंतरावर आहे ती वाहिनी; विहिरीतील पाण्याचे नमूने नेले तपासणीला
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: पेट्रोलियम पदार्थ आढळलेल्या विहिरीपासून मुरगाव बंदरातून जुआरी इंडीयन ऑईल टॅकींग लिमिटेडमध्ये विविध पेट्रोलियम पदार्थ पाठवण्यासाठी असलेली भूमीगत वाहीनी ७०० ते ९०० मीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे भूमीगत वाहीनीतून गळती होण्यास सुरवात होऊन ते पेट्रोलियम पदार्थ विहिरीत पोचले काय, त्याबाबत तपासणी करण्यासाठी त्या बाजूतून जाणाऱ्या भूमीगत वाहीनीच्या ठीकाणी खोदकामाला सुरवात केली आहे. सोमवारी रात्रीपासून जुआरी इंडीयन ऑईल टॅकींग लिमिटेड कंपनीने विहिरीतील पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत पाणी काढून टॅंकरमधून नेण्याचे काम सुरू केले असून मंगळवारी (दि.२८) दुपारपर्यंत ८ टॅंकर पाणी भरून नेले असून पाणी काढून नेण्याचे काम चालूच होते.
माटवे दाबोळी येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक जेक्सन फर्नांडीस यांच्या घराबाहेर असलेल्या खुप जुन्या विहिरीच्या पाण्यातून अचानक दोन तीन दिवसापासून पेट्रोलियम पदार्थाचा वास येण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे तेथील पंच सदस्या निलम नाईक, जैवविविधता समितीचे पदाधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी, मामलेदार इत्यादींनी तेथे उपस्थिती लावून पाहणी केली असता त्यांना विहिरीच्या पाण्यातून पेट्रोलियम पदार्थाचा वास आला. विहिरीत मिश्रीत झालेला तो पेट्रोलिय पदार्थ कुठला ते स्पष्ट झाले नसलेतरी विहिरीच्या पाण्यातून पेट्रोल - डीझल सारखा वास येत असल्याचे उघड झाले. सोमवारी विहिरीतून पेट्रोलियम पदार्थाचा वास येत असल्याचे उघड झाल्यानंतर तपासणीसाठी विहिरीतील पाणी एका बालदीत काढून त्याला आग लावली असता त्या पाण्याला आगीने पेट घेतला. विहिरीत कुठलातरी पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत झाल्याचे उघड झाल्यानंतर अग्निशामक दलाने ती विहिर सीलबंद करून लोकांना सुरक्षेसाठी विहिरीचे पाणी वापरू नका आणि त्या परिसरात आग लावू नकात अशी चेतावणी दिली होती. दरम्यान सोमवारी रात्रीच त्या परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी जुआरी इंडीयन ऑईल टॅकींग लिमिटेड व्यवस्थापनाने विहिरीतील पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत पाणी काढून नेण्यास सुरवात केली. सोमवारी विहिरीतील पाणी काढून पाच टॅंकरात भरून नेले तर मंगळवारी दुपारपर्यंत तीन टॅंकर पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत पाणी भरून नेले असून, जसे विहिरीतून पाणी खाली करण्यात येत होते तसे पाणी भरत असल्याने मंगळवारी संध्याकाळीसुद्धा पाणी काढण्याचे काम चालूच होते अशी माहीती मिळाली.
मंगळवारी सकाळी मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी, उपजिल्हाधिकारी विभागातील अधिकारी, गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळ, जलस्तोत्र विभाग, मामलेदार कार्यालयातील अधिकारी, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी, चिखली पंचायतीचे पदाधिकारी - अधिकारी, झुआरी इंडीयन ऑईल टॅकींग लिमिटेडचे अधिकारी इत्यादींनी तेथे येऊन पाहणी केली. विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत झाल्याचे एकंदरीत उघड झाल्याने तो पदार्थ कुठला आहे ते तपासण्यासाठी पाण्याचे नमूने गोवा प्रदुषण नियंत्रण महामंडळाने आणि जलस्तोत्र विभागाने नेल्याची माहीती मिळाली. त्या विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्यामागचे नेमके कारण काय ते शोधून काढण्यासाठी तपासणी सुरू झाली आहे. मुरगाव बंदराच्या धक्का क्रमांक ८ मधून झुआरी इंडीयन ऑईल टॅंकींग लिमिटेडमध्ये विविध पेट्रोलियम साठा पाठवण्यासाठी असलेली भूमीगत वाहीनी पासून ती विहिर सुमारे ९०० मीटर दूर अंतरावर उतरणीच्या भागात आहे. भूमीगत वाहीनीला गळती लागून पेट्रोलियम पदार्थ विहिरीत मिश्रीत झाले आहेत काय ते तपासण्यासाठी तेथील वाहीनीच्या परिसरात खोदकामाला सुरवात झाली आहे.
काही दिवसापूर्वीच मुरगाव बंदरात जहाजातून आलेल्या पेट्रोलियम पदार्थाचा साठा भूमीगत वाहीनीतून झुआरी इंडीयन ऑईल टॅकींग लिमिटड व्यवस्थापनात पाठवला होता अशी माहीती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. अग्निशामक दलाने केलेल्या तपासणीनुसार जेवढ्या मोठ्या प्रमाणात विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत झाला आहे ते पाहता वाहीनीतून अनेक महीन्यापासून गळती होऊन पेट्रोलियम पदार्थ त्या विहिरीच्या पाण्यात मिश्रीत होत असल्याचे जाणवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ मिश्रीत होण्याचे नेमके कारण काय आहे ते लवकरच होणाऱ्या योग्य तपासणीनंतर उघड होईल अशी माहीती सूत्रांनी दिली. मंगळवारी गोवा अग्निशामक दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांनी माटवे दाबोळी येथे येऊन लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथे पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर वास्को अग्निशामक दलाचे प्रमुख दिलीप बिचोलकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. हळदणकर यांनी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपस्थित अधिकारी आणि जवानांना मार्गदर्शन केले.