खारीवाडा मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या ट्रॉलरवर कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 08:05 PM2018-11-12T20:05:02+5:302018-11-12T20:05:05+5:30
खारीवाडा, वास्को येथील मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या मासेमारी ट्रॉलरवर कामाला असलेल्या दोन कामगारात रविवारी (११) मध्यरात्री दारूच्या नशेत वाद निर्माण झाल्यानंतर आकूब लुगून (वय ३५) ह्या कामगाराने मिथून उर्फ समीर ह्या कामगाराच्या डोक्यावर दंडुक्याने जबर हल्ले करीत त्याचा खून केला.
वास्को: खारीवाडा, वास्को येथील मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या मासेमारी ट्रॉलरवर कामाला असलेल्या दोन कामगारात रविवारी (११) मध्यरात्री दारूच्या नशेत वाद निर्माण झाल्यानंतर आकूब लुगून (वय ३५) ह्या कामगाराने मिथून उर्फ समीर ह्या कामगाराच्या डोक्यावर दंडुक्याने जबर हल्ले करीत त्याचा खून केला. आकूब याने त्याच्याबरोबर मासेमारी ट्रोलरवर कामाला असलेल्या मिथून याचा निर्घृणरीत्या खून केल्यानंतर घटनास्थळावरून पोबारा केला होता, मात्र वास्को पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोमवारी (दि.१२) पहाटे ५.३० च्या सुमारास वास्कोतील एका भागातून त्याला गजाआड केल्यानंतर ह्या खून प्रकरणात अटक केली.
वास्को पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास सदर घटना घडली. वास्को खारीवाडा येथील मासेमारी जेटीवर नांगरून ठेवलेल्या रामा तारी याच्या मासेमारी ट्रोलरवर सदर दोन्ही कामगार कामाला होते. दारूच्या नशेत त्यांच्यात रविवारी मध्यरात्री वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे परिवर्तन भांडणात झाले. रागाच्या भरात आकूब ह्या कामगाराने ट्रोलरवर असलेला दांडा घेऊन त्यांने मिथुन याच्या डोक्यावर जबर हल्ले करण्यास सुरुवात केली. यामुळे मिथुन याच्या डोक्याला गंभीर जखमा होत त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. एक कामगार दुस-यावर हल्ला करत असल्याचे जवळच नांगरून ठेवलेल्या अन्य एका मासेमारी ट्रोलरवरील एका कामगाराने पाहिल्यानंतर त्याने त्वरित याबाबत वास्को पोलिसांना माहिती दिली. आपल्या सहकारी कामगाराच्या डोक्यावर दांड्याने जबर हल्ले करून त्याला गंभीर जखमी केल्यानंतर अकूबने घटनास्थळावरून पोबारा केला. सदर घटनेत गंभीर जखमी झालेल्या मिथून ह्या कामगाराला त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेले असता येथे आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मिथून ह्या कामगाराच्या खून प्रकरणातील फरार असलेला संशयित आकूब याचा पोलीसांनी रात्री शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर सोमवारी पहाटे त्याला वास्कोतील एका लपलेल्या ठिकाण्यावरून गजाआड करण्यात आली. खून केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन काढलेल्या आकूब यास गजाआड करण्यासाठी रात्री पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ, पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर, पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस व इतर पोलीस पथकाने पूर्ण रात्र एक केल्यानंतर शेवटी पहाटे त्याला गजाआड करण्यास यश प्राप्त झाले. मरण पोचलेल्या मिथून याची पूर्ण ओळख पटलेली नसल्याची माहीती निरीक्षक रापोझ यांनी देऊन तो कुठला होता याबाबत पूर्ण चौकशी चालू असल्याचे सांगितले. मिथून हा मरण पोचलेला कामगार सुमारे ३० वर्षाचा होता असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात येत आहे. खून करून पोबारा काढलेल्या ह्या कामगाराची ट्रॉलर मालक रामा तारी यांनी पोलीस स्थानकात ओळख चाचणी अर्ज भरला नसल्याने त्याला शोधण्यास रात्रीच्या वेळी पोलीसांना बराच त्रास झाला, मात्र पोलीसांनी केलेल्या अथक प्रयत्नाचे त्यांना शेवटी पहाटे यश मिळाले. ट्रॉलर मालक रामा तारी यांनी आपल्या कामगाराचे पोलीस चाचणी अर्ज भरला नसल्याने त्याच्या विरुद्धही भा.द.स १८८ कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक रापोझ यांनी दिली. वास्को पोलीस सदर खून प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
कॅप्शन: वास्को पोलीस खून झालेल्या ट्रॉलरवर पंचनामा करताना
(छाया: पंकज शेट्ये)