गोव्यात खाण कंपन्यांकडून कामगार कपात सुरू, सेझाकडून नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 08:20 PM2018-03-21T20:20:55+5:302018-03-21T20:20:55+5:30
राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे.
पणजी : राज्यात खनिज खाण बंदी लागू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कामगार कपात सुरू केली आहे. सेझा(वेदांता) कंपनीने प्रथम कामगार कपातीला आरंभ करताना बुधवारी नोटीस जारी केली व उद्यापासून कामावर येऊ नका, असे सर्व कर्मचारी आणि कामगारांना कळवले आहे. यामुळे खळबळ माजली. दरम्यान, खाण बंदी असली तरी, लिज क्षेत्रबाहेर ठेवलेल्या खनिजाची वाहतूक करण्यास खाण खात्याने मुभा दिल्याने सुळकर्ण येथे एक कंपनी खनिजाची वाहतूक करू लागली आहे.
खाणींवर जे काम करतात, त्यांनी कामावर येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने व खाण खात्याने खनिज उत्खनन बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही मनुष्यबळ कमी करत असल्याचे खाण कंपन्यांनी नोटीशीत म्हटले आहे. खाणींच्या सुरक्षेसाठीचे काम हे खाण कंपन्यांना करावे लागेल. तशी मुभा सरकारने दिली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कामासाठी जे कर्मचारी लागतील, त्या कर्मचा:यांना आम्ही नंतर व्यक्तीश: पत्र पाठवून बोलावून घेऊ, असे सेझा मायनिंग कॉर्पोरेशनने म्हटले आहे. डिचोलीहून कामगार कपात सुरू आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण खाणबंदी लागू केलेली असताना दक्षिण गोव्यातील सुळकर्ण येथे माईनस्केप ही कंपनी खनिज वाहतूक कशी काय सुरू ठेवू शकते असा प्रश्न गोवा फाऊंडेशनसह आणखी काहीजणांनी उपस्थित केला आहे. खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांना लोकमतने याविषयी विचारले असता, त्यांनी लिज क्षेत्रबाहेर ठेवल्या गेलेल्या खनिजाची जेटीर्पयत वाहतूक करता येते असे सांगितले. आचार्य यांनी सरकारी बैठकीचे इतिवृत्तही सादर केले. मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती यांच्या सहभागाने गेल्या 16 रोजी जी तातडीची बैठक झाली होती, त्या बैठकीवेळी लिज क्षेत्रबाहेरील खनिजाची (जर रॉयल्टी भरलेली असेल तर)वाहतूक करता येते असे ठरलेले आहे. इतिवृत्तात तसे नमूद करण्यात आले आहे. खाण बंदीच्या काळात ट्रक मालक, बार्ज मालक आदींना व्यवसाय मिळावा या हेतूने खनिज लिज क्षेत्रबाहेरील मालाची वाहतूक करता येते. अॅडव्हकेट जनरलांनीही तसाच सल्ला दिला आहे, असे बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आले आहे.
क्लॉडकडून आक्षेप
या प्रतिनिधीने गोवा फाऊंडेशनचे प्रमुख क्लॉड अल्वारीस यांना विचारले असता, ते म्हणाले की खाण बंदी जेव्हा लागू होते, त्यावेळी लिज क्षेत्रच्या आतिल व लिज क्षेत्रच्या बाहेरील माल असा फरक शिल्लक राहतच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ानुसार खरे म्हणजे कोणतीच खनिज वाहतूक चालू शकत नाही. लिजेस रद्द झालेली असल्याने लिजांच्या सीमाही रद्द झाल्या. मग लिज क्षेत्रच्या आतिल व बाहेरील असे म्हणताच येणार नाही. सुळकर्ण येथे जे काही सुरू आहे ते अत्यंत आक्षेपार्हही आहे, असे अल्वारीस म्हणाले. खाण खात्याची देखरेख नसताना कथित लिज क्षेत्रबाहेरीलही खनिजाची वाहतूक करता येत नाही. बाहेरील खनिज नेण्याच्या नावाखाली आतिलही खनिज नेले जाईल. खाण कंपन्यांनी लिजेस मोकळी केल्यानंतर आता त्यांनाच पुन्हा खाणींमधून पाणी बाहेर काढण्याची मुभा देणो देखील पूर्णपणे आक्षेपार्ह आहे.