भाजपच्या माजी आमदारांना कार्यकर्त्यांनी जागा दाखवली : तेंडुलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 08:04 PM2018-10-17T20:04:53+5:302018-10-17T20:05:05+5:30
भाजपाचे काही माजी आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आमदारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पक्षातील काही असंतुष्टांचा बुधवारी समाचार घेतला.
पणजी : भाजपाचे काही माजी आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांशी योग्य प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा आमदारांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पक्षातील काही असंतुष्टांचा बुधवारी समाचार घेतला. पक्षाच्या येथील कार्यालयात भाजपाच्या कोअर टीमची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. ती बैठक प्रचंड वादळी ठरली.
बैठकीनंतर पत्रकारांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या टीकेविषयी तेंडुलकर यांना विचारले. दयानंद सोपटे किंवा सुभाष शिरोडकर यांना पक्षात घेताना पार्सेकर वगैरेंना विचारले नाही अशी टीका होत आहे. तसेच गेल्या निवडणुकीच्या पराभवाचे खापर आपल्यावर अकारण फोडले गेले, असे पार्सेकर म्हणत असल्याविषयी काय वाटते. असे तेंडुलकर यांना विचारताच तेंडुलकर म्हणाले, की आम्हाला भाजप बळकट करायचा आहे. सोपटे व शिरोडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही मांद्रे व शिरोडा हे दोन्ही मतदारसंघ निश्चितच जिंकणार आहोत. सोपटे यांना भाजपाचा यापूर्वीचा अनुभव आहे. ते कार्यकर्त्यांशी चांगले वागतील. शिरोडकर तर सहा वेळा शिरोडय़ातून निवडून आले आहेत. भाजपाचे काही माजी आमदार कार्यकर्त्यांशी चांगल्या प्रकारे वागले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.
तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची राष्ट्रीय स्तरावरील घोषणा आहे. त्याच पद्धतीने पक्ष पुढे जात आहे. काँग्रेसमधील जर कुणी आमच्या पक्षात येत असतील तर आम्ही त्यांना रोखू शकत नाही. यापुढे देखील आणखी तिघे काँग्रेस आमदार पक्ष सोडू शकतात. ते तिघे आमदार भाजपामध्ये, गोवा फॉरवर्डमध्ये की मगो पक्षात जातील ते आम्ही सांगू शकत नाही.
तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष सोडून आलेल्या शिरोडकर व सोपटे यांना आमच्या पक्षाने एकही पैसा दिलेला नाही. त्यांच्यासाठी पक्षाने एक देखील पैसा खर्च केला नाही. त्यांच्या विमानाचे तिकीटही त्यांनीच काढले व त्यांच्यासाठी हॉटेलची खोली आरक्षित देखील त्यांनी स्वत:च केली. भाजपाने केलेली नाही. खाण मालकाने पैसा दिला, असा चुकीचा प्रचार केला जात आहे.