टोंक, मिरामार येथे गॅस पाईपलाईन कार्यान्वित; मध्य पणजीत ३००० कुटुंबांना जोडण्या देणार
By किशोर कुबल | Published: March 8, 2024 02:52 PM2024-03-08T14:52:08+5:302024-03-08T14:52:16+5:30
जोडण्यांसाठी लोकांनी मोबाईल क्रमांक 91 7507045630 तसेच info@gonaturalgas.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पणजी : नैसर्गिक वायू पाईपलाईन द्वारे वितरीत करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटी मिशनचा एक भाग म्हणून टोंक, मिरामार येथे पै भवन सोसायटीजवळ गॅस पाईपलाईन कार्यान्वित करण्यात आली.
राजधानी शहर भविष्यात “एलपीजी मुक्त शहर” बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य पणजीत अंदाजे तीन हजार कुटुंबांना तसेच येत्या काही आठवड्यांमध्ये सांतइनेज भागात आणखी तीन हजार जोडण्या दिल्या जाणार आहेत. निवासी कनेक्शन्स व्यतिरिक्त रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससह सर्व व्यावसायिक आस्थापनांनाही जोडण्यांचा विस्तार करण्यात येणार आहेत.
जोडण्यांसाठी लोकांनी मोबाईल क्रमांक 91 7507045630 तसेच info@gonaturalgas.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दोनशेहून अधिक किलोमीटरची ही विस्तृत पाइपलाइन असून पणजीच्या निवासी भागात अखंड नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित करते. एलपीजी पेक्षा नैसर्गिक वायूची किंमत १७ ते २० टक्के कमी किंमत आहे. कोळशापेक्षा ३३ टक्क्यांपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन आणि तेलापेक्षा १२ टक्के कमी कार्बन उत्सर्जन होते, असा दावा करण्यात आला.
जागतिक महिला दिनी हा उपक्रम सुरू करण्याचा इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडचा निर्णय शहरातील नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी आपली वचनबद्धता अधोरेखित करतो, असे स्मार्ट सिटी चे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांनी सांगितले.