छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 09:06 AM2023-04-06T09:06:15+5:302023-04-06T09:06:44+5:30
मातृभूमी संस्थेतर्फे सत्कार सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: छत्रपती शिवरायांमुळेच गोमंतक भूमी आणि संस्कृती टिकून राहिली, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सावंतवाडी येथील मातृभूमी शिक्षण संस्था आणि शिवसंस्कारतर्फे रविवारी (ता.२) आयोजित सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारापासून प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या शिवसंस्कार संस्थेचे अभिनंदन करून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले.
साखळी येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या सोहळ्याला आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, सिनेअभिनेते स्वप्निल राजशेखर, हिंदू शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष मंदार गावडे, सुभाष मळीक, मातृभूमीच्या अध्यक्ष डॉ. सोनाली लेले, शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
नाटक, सिनेमा याच्यापुरते मर्यादित न राहता, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी वाचन आवश्यक असल्याचे मत स्वप्निल राजशेखर यांनी व्यक्त केले. आगामी काळात शिवसंस्कारच प्रत्येकाला तारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती करून द्यावा, असे आवाहन केले.
पुणे येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि संघर्ष प्रेरणादायी आहे. गणेश ठाकूर यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन मिलिंद कासकर, गावस यांनी केले.
सन्मानाचे मानकरी
या सोहळ्यात पांडुरंग बलकवडे (ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुणे), वल्लभ गावस देसाई (इतिहास अभ्यासक, गोवा) आणि प्रभाकर ढगे (पत्रकार, साहित्यिक) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर नारायण मानकर (मुख्याध्यापक, कळसूलकर हायस्कूल, सावंतवाडी), अनिल ठाकर (शिक्षक, कळसूलकर हायस्कूल, सावंतवाडी), प्रजा मातोंडकर (मळगाव), अतुल मळीक (कुडणे), गोविंद साखळकर ( डिचोली) आणि अवधूत बीचकर (शिवसंस्कार डिजिटल प्रसारक, कराड) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या सोहळ्यात 'शिवसंस्कार' अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध ऐतिहासिक स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"