राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 08:01 AM2024-08-22T08:01:41+5:302024-08-22T08:02:21+5:30
या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपची सदस्यता मोहीम येत्या महिन्याच्या प्रारंभी सुरू होणार आहे. त्यासंबंधी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व गोवा प्रभारी आशिश सूद यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत याप्रसंगी उपस्थित होते.
या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती. यावेळी ही संख्या वाढणार आहे. २७ ते २९ असे तीन दिवस प्रत्येक मतदारसंघात कार्यशाळा होतील. जुने, नवे अशा सर्वच कार्यकर्त्यांनाही नव्याने सदस्य करून घेतले जाईल. येत्या ३१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सदस्यत्त्व स्वीकारतील व नंतर देशभरात सदस्यता नोंदणी सुरू होईल. काँग्रेसमधून फूटून आलेल्या आमदारांचा सदस्य वाढवण्यासाठी फायदा होणार का, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, सर्वांनाच सदस्य करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.
सदस्य नोंदणी निः शुल्क असणार आहे. मोबाइल नंबरवर मिस कॉल देऊन अथवा ऑनलाइनही नोंदणी करता येईल. दरम्यान, शनिवारी २४ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते कदंब पठारावर भाजप कार्यालय इमारतीसाठी पायाभरणी होणार आहे.