३०० टन साठ्यातील काही गोण्यांवर किडे; नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 03:40 PM2023-05-11T15:40:19+5:302023-05-11T15:41:09+5:30
'लोकमत'च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे, दुकानदारांकडून तांदूळ मागवला परत
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: कुठ्ठाळी येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आणलेल्या तांदळाच्य साठ्यात अळ्या सापडल्याचे वृत्त बुधवारी 'लोकमत'ने प्रसिद्ध करताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर नागरी पुरवठा खात्याच्या संचालकांनी याची दखल घेत कुठ्ठाळी येथील गोदामाची झडती घेतली असता ३०० 'लोकमत'च्या टन साठ्यातील काही गोण्यांवर अळ्यासदृश किडे दिसून आले. तसेच काही स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली असता जवळपास १ टनहून अधिक साठ्यात अळ्या झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती नागरी पुरवठा खात्यातील सूत्रांनी दिली.
मुरगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कुठ्ठाळी येथील गोदामातून उचललेला तांदूळ सडल्याचे तसेच अळ्या झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर 'लोकमत'ने याची शहानिशा करत स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली असता सत्य दिसून आले. याबाबत मुरगाव तालुका नागरी पुरवठा विभागाच्या निरीक्षक सरिता मोरजकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर बुधवारच्या अंकात लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच नागरी पुरवठा खात्याला खडबडून जाग आली.
वृत्ताची दखल घेत गुरुवारी नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी कुठ्ठाळी येथील गोदामाला भेट दिली. यावेळी गोदामातील ३०० टन तांदळाच्या साठ्याची तपासणी केली असता या अनेक गोण्यांवर अळ्यासदृश किडे दिसून आल्याचे निरीक्षक सरिता मोरजकर यांनी माहिती दिली. मुरगाव तालुक्यातील ४१ स्वस्त रेशन धान्य दुकानदारांपैकी सुमारे २५ जणांनी पाच दिवसांपूर्वी तांदळाचा साठा गोदामातून उचलला होता. त्यापैकी अनेक दुकानदारांना मिळालेल्या तांदळात अळ्या झाल्याचे समोर आले. याबाबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर लोकमतने दखल घेऊन या प्रकरणाला वाचा फोडल्याने प्रशासन जागे झाले होते.
- नागरी पुरवठा खात्याने तातडीने उपाययोजना म्हणून गोदामात औषध फवारणी केली आहे. तसेच तांदळात अळ्या झाल्याच कशा याची तपासणी करण्याच्या सूचना नागरी पुरवठा संचालकांनी दिल्या आहेत.
- ज्या दुकानदारांकडे असा निकृष्ट तांदूळ पोहोचलेला आहे, त्यांना तो बदलून देण्यात येणार आहे.
- उपनिरीक्षकांनी बायणा, मांगोरहील, सडा आदी भागातील दुकानदारांना मिळालेल्या साठ्याची पाहणी केली असता निकृष्ट तांदूळ दिसून आला.
- मुरगाव तालुक्यातील स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना आलेल्या साठ्यांपैकी किती माल निकृष्ट दर्जाचा होता त्याबाबत मोरजकर यांना विचारले असता ते सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगून सुमारे ४०० ते ५०० किलो माल निकृष्ट असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
- नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविले असून लवकरच योग्य चौकशी करून त्यांना अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती मोरजकर यांनी दिली.
रेशनकार्डएपीएलमध्ये बदलून घेण्यासाठी येत्या १५ पर्यंत मुदत
सर्व सरकारी कर्मचारी तसेच अन्य नागरिक ज्यांचे उत्पन्न जास्त असतानाही पीएचएच किंवा अंत्योदय रेशन कार्डावर मोफत धान्याचा लाभ घेत आहेत, त्यांनी आपले कार्ड एपीएलमध्ये बदलून घेण्यासाठी येत्या १५ तारीखपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरी पुरवठा खात्याने यासंबंधीचा आदेश काढला आहे. वार्षिक ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच पीएचएच कार्डावर मोफत धान्य घेता येते. त्यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना नाही. आतापर्यंत २००० कार्डधारकांनी आपले कार्ड एपीएलमध्ये बदलून घेतले आहेत.
अहवाल मागवला
अळ्या झालेल्या तांदूळ प्रकरणाची नागरी पुरवठा खात्याने गंभीर दखल घेतली आहे. लोकमतच्या वृत्तानंतर संचालक गोपाळ पार्सेकर यांनी पाहणी केली व या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती निरीक्षक सरिता मोरजकर यांनी दिली.
गोदामाची घेतली झडती
बुधवारी सकाळी १० च्या सुमारास नागरी पुरवठा खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांनी कुठ्ठाळी येथे असलेल्या गोदामात येऊन तेथील तांदळाची तपासणी केली. यावेळी गोदामात ३०० टन साठा होता. या तपासणीवेळी मुरगाव नागरी पुरवठा विभागाच्या निरीक्षक सरिता मोरजकर व इतर अधिकारी उपस्थित होते. तपासणीत गोदामातील काही गोण्यांवर अळ्यासदृश किडे दिसून आले.
खात्याच्या निरीक्षकांना तांदूळ बदलून देण्यास सांगितले आहे. तांदळाला कीड लागल्याची माहिती मला मिळताच मी माझ्या टीमसह गोदामाची पाहणी केली. या पाहणीत कीड लागलेला तांदूळ सापडला नाही. गोदामातील केवळ १० ते १२ गोण्यांमध्ये असा प्रकार घडला असेल परंतु, ही कीड कुठून लागली त्याची तपासणी सुरु आहे. लोकांना निकृष्ठ दर्जाचा तांदूळ अजिबात दिला जाणार नाही. - गोपाळ पार्सेकर, संचालक, नागरी पुरवठा खाते