‘मिसिंग आॅन अ वीकएंड’ चित्रपटात गोव्याचे चुकीचे चित्रण
By admin | Published: July 1, 2016 06:58 PM2016-07-01T18:58:53+5:302016-07-01T19:24:58+5:30
‘मिसिंग आॅन अ वीकएंड’ या हिन्दी थ्रिलर चित्रपटात गोव्याचे चित्रण ड्रग्स आणि वेश्या व्यवसायाची भूमी असे केल्याने राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी त्यास तीव्र हरकत घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १ - ‘मिसिंग आॅन अ वीकएंड’ या हिन्दी थ्रिलर चित्रपटात गोव्याचे चित्रण ड्रग्स आणि वेश्या व्यवसायाची भूमी असे केल्याने राज्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी त्यास तीव्र हरकत घेतली आहे. गोव्याची प्रतिमा यामुळे मलीन होत असून सेन्सॉर बोर्डाला सरकार पत्र लिहून आपल्या भावना कळविणार असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. गोवा हे पर्यटनस्थळ आहे. राज्याची प्रतिमा अशी मलीन करता येणार नाही. आमची अस्मिता आम्ही सांभाळली पाहिजे, असे ते म्हणाले. निर्माता गोव्याबद्दल अशी चुकीचे चित्रण कसे करु शकतो, असा संतप्त सवाल परुळेकर यांनी केला. या चित्रपटातील नको असलेली दृश्ये काढून टाकणे निर्मात्याला भाग पाडू, त्यासाठी राज्य सरकार न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यासही मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. अभिषेक जावकर दिग्दर्शित या चित्रपटात गोव्यात ड्रग्स तसेच वेया सहजपण मिळतात, अशा आशयाचे उद्गार आहेत. दरम्यान, ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी) या पर्यटन उद्योजकांच्या संघटनेनेही याचा निषेध केला असून गोव्यातील पर्यटन उद्योगालो बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खाली आले आहे. वेश्या व्यवसायही मोडून काढला जात आहे अशा स्थितीत चुकीची माहिती पसरविणे योग्य नव्हे असे संघटनेचे अध्यक्ष सावियो मेसियस म्हणाले. हा चित्रपट अजून रीलीज झालेला नाही. ड्रग्सवर आधारित ‘उडता पंजाब’ चित्रपट आधीच वादात सापडला असताना त्यापाठोपाठ आता वरील चित्रपटाने वाद निर्माण केला आहे.