खड्ड्यांचा धोका सांगण्यासाठी मडगावात यमराज रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 08:29 PM2019-10-17T20:29:55+5:302019-10-17T20:30:10+5:30
सध्या गोव्यातील रस्ते खड्डेमय झाले असताना हा प्रश्न अगदी उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे.
मडगाव: सध्या गोव्यातील रस्ते खड्डेमय झाले असताना हा प्रश्न अगदी उच्च न्यायालयात पोहोचलेला आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मडगावच्या शॅडो कौन्सिल या संघटनेने मडगावच्या मुख्य रस्त्यावर आ वासलेल्या यमराजाच्या तोंडाचे पोस्टर लावून हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत, हे दर्शविण्यासाठी प्रातिनिधिक आंदोलन केले. मडगावच्या मुख्य चौकावर चार ठिकाणी असे पोस्टर लावल्याने वाहन चालकांचेही लक्ष त्याकडे जाऊ लागले आहे.
यासंदर्भात माहिती देताना शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो म्हणाले, मडगावचे रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही अभियंत्यांना घेरावही घातला तरीही रस्त्याची दुरुस्ती हाती न घेतल्याने आता लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे यमराजाचे पोस्टर रस्त्यावर लावले आहेत. निदान आता तरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष या ज्वलंत समस्येकडे जाईल अशी आम्हाला आशा आहे.
मडगाव शहरातील मुख्य रस्ता, राष्ट्रीय हमरस्ता असून एका वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण केले होते. मात्र त्यानंतर पहिल्याच पावसात रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्याची डागडुजी त्वरित हाती घेतली जाईल असे आश्र्वासन यापूर्वी सरकारने दिले होते. मात्र हे आश्र्वासन देऊन पंधरवडा उलटला तरीही रस्ते दुरुस्त होत नसल्याबद्दल आता नागरीक रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदोलनाबद्दल बोलताना कुतिन्हो म्हणाले, वास्तविक कुठल्याही रस्त्याचे डांबरीकरण केल्यानंतर तीन वर्षे त्या रस्त्याची देखभाल त्या कंत्रटदाराकडून करणो बंधनकारक आहे. मात्र आजवर सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता खराब झाल्यानंतर सरकारी तिजोरीतून या दुरुस्तीवर पैसा खर्च करत असे. मात्र यावेळी आम्ही करदात्यांचा पैसा असा वाया घालवू देणार नाहीत. या रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरण केलेल्या कंत्रटदाराच्या पैशांतूनच केली जावी अशी आमची मागणी असून या डांबरीकरणासाठी सरकारी पैसा खर्च केला तर सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही न्यायालयात खेचू अशा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शॅडो कौन्सिलच्या राधा कवळेकर, लॉरेल आंब्राचिस, फेलिक्स फर्नाडिस व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.