मागोवा २०२४: वादग्रस्त टिप्पणींमुळे गाजली धार्मिक आंदोलने; दक्षिण गोव्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2024 08:11 IST2024-12-25T08:11:02+5:302024-12-25T08:11:56+5:30
अखेरीस विरोधी पक्ष दिसला सक्रिय

मागोवा २०२४: वादग्रस्त टिप्पणींमुळे गाजली धार्मिक आंदोलने; दक्षिण गोव्यात रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पर्यटनाबरोबरच शांतता तसेच सामाजिक व धार्मिक सलोख्यासाठी ओळखला जाणारा गोवा २०२४ या वर्षात भलत्याच कारणांसाठी चर्चेत राहिला. कधी नव्हे ते यावर्षी धार्मिक वादांमुळे राज्यात आंदोलन झाली. मग ती सेंट फ्रान्सिस झेवियर असो किंवा देवी लईराईवरील टिप्पणीमुळे उफाळलेला वाद असो. भाविकांनी रस्त्यावर येत आंदोलन केले.
आरएसएसचे माजी गोवा प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. वेलिंगकर यांनी माफी मागावी तसेच यांना अटक करावी, अशा मागण्यांसाठी राज्यातील विविध भागात जवळपास एक आठवडा आंदोलने झाले. मडगाव व अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाली. त्यावेळी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. अटक होईल या भीतीने वेलिंगकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. पोलिसांनीही त्यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर हा वाद शांत झाला.
यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या श्रेया धारगळकर यांनी श्री देवी लईराईविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे भाविकांनी पोलिस स्थानकावर धडक मोर्चा नेला. अखेर वाद वाढल्याने पोलिसांनी श्रेयाला अटक केली. तिने यावर्षी केलेला हा पहिलाच वाद नसून दक्षिण गोव्यातील एका विशिष्ट सामाजावरही केलेल्या टीकेमुळे त्या अडचणी आल्या होता. श्रेयाला अटक करा म्हणून आंदोलनही झाले. शेवटी तिने माफी मागितल्याने वाद शमला होता.
काही दिवसांपूर्वीच पर्ये येथील साखळेश्वर देवस्थानातील धार्मिक विधीवरून वाद निर्माण होत केरी येथील चोर्ला घाटाकडे जाणाराही रस्ता अडवला होता. धार्मिक वादांप्रमाणेच धारगळ येथे होणाऱ्या सनबर्न महोत्सवाच्या आयोजनाला तेथील लोकांनी तीव्र विरोध केला तर दुसरीकडे सांकवाळ येथील प्रस्ताविक भूतानी प्रकल्पाविरोधात स्थानिकांनीही आंदोलन छेडले. स्थानिक पंचायतीच्या काही पंच सदस्यांनीच या प्रकल्पाविरोधात उपोषण सुरू केले. सरकारवर हा प्रकल्प रद्द करावा म्हणून दबावही घालण्यात आला. प्रकल्प रद्द झाला नसला तरी सध्या हे आंदोलन काहीसे थंड पडले आहे.
काँग्रेसही उतरली मैदानात
वर्षभर मोठ्या आंदोलनापासून लांब असलेला विरोधी पक्ष काँग्रेस वर्षाअखेर भलत्याच फॉर्ममध्ये आली आहे. नोकरीकांड, भ्रष्टाचार, राज्यातील भू बळकाव प्रकरणातील प्रमुख संशयित सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याने पोलिस कोठडीतून केलेले पलायन यावरून काँग्रेसने सरकारविरोधात आंदोलन केले. या आंदोलनावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली. एकूणच २०२४ या सरत्या वर्षात गोवा खऱ्या अर्थाने आंदोलनांसाठी ओळखला गेला.