मागोवा २०२४: मागील वर्षाच्या तुलनेत दक्षिण गोव्यात अपघात घटले
By पंकज शेट्ये | Updated: December 27, 2024 10:44 IST2024-12-27T10:42:22+5:302024-12-27T10:44:24+5:30
दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत यंदा एकही अपघात घडलेला नाही.

मागोवा २०२४: मागील वर्षाच्या तुलनेत दक्षिण गोव्यात अपघात घटले
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत दक्षिण गोव्यात रस्ता अपघाताचे प्रमाण ७.९८ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले. दक्षिण गोव्यातील १७ पोलिस स्थानकांच्या हद्दीत नोव्हेंबर अखेरपर्यंत १ हजार १७६ अपघात घडले. याच काळात गेल्यावर्षी अपघातांची संख्या १ हजार २७८ होती. यंदा घडलेल्या काही अपघातात लोकांना प्राण गमवावा लागला असून नोव्हेंबर अखेरपर्यंत १२४ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी २०२३ सालात १४९ जण अपघातात मरण पावले होते.
दक्षिण गोव्यात २०२४ सालाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत १ हजार १७६ अपघात घडले असून २०२३ सालात अपघातांची संख्या याच्यापेक्षा थोडी जास्त होती. गेल्या वर्षासारखेच यंदा वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्वांत जास्त असे २०२ अपघात घडले असून २०२३ मध्ये येथे अपघाताची संख्या २२६ होती. वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत नोव्हेंबर पर्यंत झालेल्या विविध अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला. मागील गेल्या वर्षी मरण पावणाऱ्यांची संख्या २३ होती.
दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत यंदा एकही अपघात घडलेला नाही. गेल्यावर्षी दाबोळी विमानतळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत एक अपघात घडला होता. दक्षिण गोव्यातील म्हार्दोळ, कुळे, मडगाव, कुडचडे आणि सांगे या पोलिस स्थानकांच्या हद्दीत गेल्या वर्षापेक्षा यंदा अपघाताची संख्या वाढली. तर इतर पोलिस स्थानकाच्या हद्दीत संख्या घटली आहे.
तसेच गेल्या वर्षापेक्षा यंदा नोव्हेंबर अखेरीस पर्यंत फोंडा, कुळे, कोलवा आणि कुडचडे अशा चार पोलिस स्थानकांच्या हद्दीत अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०२३ सालात दक्षिण गोव्यात विविध अपघातांत १४९ जणांचा मृत्यू झाला. यंदा अपघातात मरण पावणाऱ्याच्या संख्येत १६.७८ टक्के घट झाल्याची माहिती मिळाली.