मागोवा २०२४: कला अकादमी दुरुस्ती वाद सर्वाधिक गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:46 IST2024-12-27T10:45:49+5:302024-12-27T10:46:44+5:30
सांस्कृतिक क्षेत्रातील उदासिनता चिंताजनक : कार्यक्रमांना प्रेक्षक जमविण्याचे आयोजकांसमोर आव्हान

मागोवा २०२४: कला अकादमी दुरुस्ती वाद सर्वाधिक गाजला
अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कला अकादमीच्या प्रश्नावरून संपूर्ण वर्षभर कलाकार आणि सरकारमधील संघर्ष लोकांना दिसून आला. या प्रश्नावरून काही लेखक, कलाकारांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. एक मोठी चळवळ उभी राहते की काय असेही वाटून गेले. मात्र, तूर्तास ह्या प्रश्नावरून संघर्ष कमी होताना दिसत आहे. 'अ' गट नाट्य स्पर्धाही आता कलाकदामीमध्ये सुरू झालेली आहे.
राज्याला कला व संस्कृती क्षेत्रातला मानदंड म्हटले जाते. येथे दर दिवशी कला व साहित्य क्षेत्रात काही ना काही घडत असते. पूर्वी अशा कार्यक्रमाना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळायचा. अलिकडील काळात लोकोत्सव, सेरंडीपिटी, इफ्फी सारखे कार्यक्रम सोडले तर बहुतांश कार्यक्रमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. घुमट आरती, भजनी, फुगडी आदी स्पर्धांना सुरुवातीला प्रेक्षकागृह काठोकाठ भरलेले आढळून यायचे. जसा दिवस उतरतीला लागेल तसे प्रेषकागृह ओस पडल्येचीही लोकांनी पाहिले. याला कारण म्हणजे स्पर्धेला फक्त स्पर्धक व त्यांचे हितचिंतक येतात. एकदा त्या गटाचे त्या समूहाचे सादरीकरण संपले की मग तो गट तो समूह ते कलाकार प्रेक्षकागृहातून बाहेर जातात.
कला व संस्कृती खाते मोठे अनुदान देते. त्याच्या जोरावर संमेलन करायची. वर्तमानपत्रातून फोटो छापून आणायचे असे होताना दिसत आहे. मात्र, संमेलनासाठी प्रेक्षक आणण्यासाठी जी काही मेहनत घ्यायला हवी ती घेतली जात नाही.
दोन दिवसापूर्वी फोंड्यात लाखो रुपये खर्च करून मोहम्मद रफी स्मृती गायन कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम आहे हे फोंड्यातील कुणालाच माहीत नव्हते. काही आयोजक फक्त सोपस्कार म्हणून कार्यक्रम करताना दिसतात. देवळामधून मोठ्या संख्येने कीर्तने होताना दिसतात.
हभप सुहास बुवा वझे यांच्या प्रयत्नातून आज नवीन होतकरू कीर्तनकार तयार झालेत. मागच्या संपूर्ण वर्षभरात ह्या बाल कीर्तनकारानी वेगवेगळ्या मंदिरामधून आपली सेवा दिल्याने बाहेरील कीर्तनकार यायचे कमी झाल्याचे चित्र आढळून आले. साहित्याच्या बाबतीतही उदासीनता दिसून येत आहे. कोंकणी, मराठी मिळून ह्या वर्षात सुमारे २०० पुस्तके प्रकाशित झाली. मात्र, यातील किती पुस्तके लोकांच्या स्मरणात राहतील हा लाख मोलाचा प्रश्न आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात लोक जमले पाहिजेत.
लेखक, प्रकाशकांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर प्रेक्षक मिळवले पाहिजेत. मात्र आज मोजकेच लेखक सोडले किंवा प्रकाशक सोडले तर पुस्तक प्रकाशन समारंभाला अवघेच लोकआणि वाचक येताना दिसून आले. काही लेखकानी तर मंत्र्यांच्या केबिनमध्ये किंवा उद्योगपतीच्या केबिनमध्ये उभे राहून फक्त फोटोसेशन करत पुस्तक प्रकाशन करण्याचा प्रकार घडवून आणला.
प्रेक्षक संख्या घटतेय
फोंड्यातील राजीव कला मंदिरात दर वर्षी कोकणी नाट्यस्पर्धा, भजनी स्पर्धा, फुगडी स्पर्धा, महिला नाट्यस्पर्धा, ऐतिहासिक नाट्य स्पर्धा होतात. कलाकार बिचारे दोन-तीन महिने मेहनत घेऊन नाटके उभारतात, सादर करतात. मात्र, ते पाहायला परीक्षक आणि काही मोजकेच लोक हजेरी लावतात. या वर्षीही परिस्थितीमध्ये बदल दिसला नाही. आज गोव्यामध्ये भरमसाट संगीत संमेलने होत आहेत. या वर्षीही ती झाली. मात्र या संमेलनाला श्रोते किती हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. एकेकाळी सूरश्री केसरबाई केरकर किंवा सम्राट संगीत संमेलनाला खुर्चा कमी पडायच्या. यावेळी संपूर्ण राज्यात झालेल्या वेगवेगळ्या संगीत संमेलनांना मोजकेच प्रेक्षक उपस्थिती लावताना आढळून आले.
उदासिनतेची भीती
साहित्य संमेलने, युवा संमेलने उदंड झाली. परंतु इथेही उपस्थिती किती हा प्रश्न उभा राहिला. एक प्रकारची उदासीनता कला, साहित्य व संस्कृती क्षेत्रात येऊ लागले आहे की काय अशी भीती उत्पन्न होऊ लागली. लोकोत्सवसारख्या कार्यक्रमाला अख्ख्या गोमंतकातून लोक जमतात. इथे त्यांची जनसंपर्क प्रणाली महत्त्वाची आहे. लोकोत्सवाच्या व्यवस्थापनचा अभ्यास प्रत्येक आयोजक संस्थांनी करायला हवा. जेणेकरून निदान आगामी वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील. किंवा सरकारने प्रेक्षक संख्येबाबत नियम करून अनुदान देण्याबाबत नियम करावा, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.