मागोवा २०२४: मालमत्तेचे वाद, अवैध बांधकामे घरांवरील कारवाईने गाजले वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:49 IST2024-12-27T10:49:16+5:302024-12-27T10:49:16+5:30
बार्देशातील घडामोडींमुळे चर्चेत : 'बाउन्सर'मुळे खाकी डागाळली गेली

मागोवा २०२४: मालमत्तेचे वाद, अवैध बांधकामे घरांवरील कारवाईने गाजले वर्ष
प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सनबर्नच्या आयोजनाच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद, सुलेमान सिद्दिकी याच्या गणेशपुरी येथील घरावर केलेली कारवाई, कुचेली परिसरात कोमुनिदादच्या जागेत घरांवर केलेली कारवाई, करासवाडा परिसरात दुकानांवर झालेली कारवाई, असे विविध वाद चर्चेत राहिले, तरी आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घरावर जेसीबीचा वापर करून केलेली कारवाई तसेच मालमत्तेवरून निर्माण झालेले वाद बार्देश तालुक्यात वर्षभरात बरेच गाजले.
मालमत्तेवरून निर्माण झालेले वाद बार्देश तालुक्यातून बरेच गाजले. यात सर्वांत लक्षवेधी ठरला तो आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांच्या घरावर झालेली कारवाई. जून महिन्यात घडलेल्या या प्रकाराचा सर्व स्तरांवरून निषेध व्यक्त करण्यात आला होता. कसल्याच प्रकारच्या नियमांचे पालन न करताना कारवाईसाठी रितसर परवानगी नसताना बाऊंसरांच्या उपस्थितीत जेसीबीचा वापर करून घर पावसाळ्यात मोडून टाकण्यात आले. घडलेल्या प्रकारानंतर हणजूण पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक प्रशल देसाई तसेच इतरांना सेवेतून निलंबीत करण्यात आले होते. तसेच कारवाईत सहभागी झालेल्या काही व्यक्तींना अटकही केली. घडलेल्या प्रकाराची नंतर मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते.
खडपवाडा-कुचेली येथे सार्वजनिक स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या सरकारी जागेत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर घरांवर १२ नोव्हेंबर रोजी कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. सुमारे ५ हजार चौरस मिटर जमीन स्मशानभूमीसाठी आरक्षित केलेल्या जागेत एकूण १४० घरांपैकी ३६ घरांवर कारवाई करून ती मोडून टाकण्यात आली. त्यातील बरीच घरे चार ते पाच वर्षांपूर्वीची होती.
सदर जागा बेकायदेशीरपणे तेथील लोकांना विकण्यात आली होती. त्यानंतर बांधलेली घरे कायम करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी काही लोकांकडून चार ते पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. काहीजणांनी तर अंगावरील दागिने विकून पैशांची जमवाजमव केली होती. लोकांनी केलेल्या आरोपानंतर म्हापसा पोलिसांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यासहित काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती.
गुन्हे विभागाच्या कस्टडीत असलेला तसेच मालमत्ता प्रकरणातील मुख्य संशयित सराईत गुन्हेगार सुलेमान सिद्दिकी याच्या एकतानगर गणेशपुरीत बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या घरावर म्हापसा पालिकेकडून कारवाई करून मोडले होते. ऑक्टोबरमध्ये कारवाई झाली होती. मागील वर्षभरात कळंगुट पंचायत क्षेत्रात तर अनेक बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात आली, यात बेकायदेशीरपणे विस्तार केलेल्या काही हॉटेलांचा, कोमुनिदाद जागेतील घरांचा त्यात समावेश होतो. केलेल्या या कारवाईत सुमारे ५० हून जास्त बांधकामांचा समावेश होता.
व्यावसायिक आस्थापनांवरही कारवाई
करासवाडा येथे रस्त्यालगत उभारण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे म्हापसा पालिकेकडून कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात केलेल्या या कारवाईत ३५ बांधकामांचा त्यात समावेश होता. जंक्शनवर सर्विस रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्याची आली. यात विविध प्रकारच्या व्यावसायिकांचा त्यात समावेश होता.
सनबर्न, विद्यापीठ मुद्दे गाजले
कुचेली येथील कोमुनिदादच्या जागेत सनबर्नचे आयोजन करण्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. शेवटी कोमुनिदादने सनबर्नचा विरोध करणारा ठराव मंजूर केल्याने कुचेलीतील वादावर पडदा पडला. थिवी येथील कोमुनीदादच्या जागेत एका खासगी विद्यापिठाला देण्यात आलेल्या परवानगीनंतर तेथील लोकांनी तिला विरोध करण्यास सुरुवात केली. पंचायतीच्या ग्रामसभेतही विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. संबंधीत विद्यापिठाला विरोध करताना आंदोलनही छेडण्यात आले आहे.